प्रसिद्ध व्यावसायिक करीम हुंडेकरी खंडणी व अपहरणप्रकरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगर : शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक करीम हुंडेकरी यांचे २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या कुख्यात गुंड अझहर मंजूर शेख (३६, फकीर गल्ली, नगर) व त्याचा साथीदार निहा ऊर्फ बाबा मुशर्रफ शेख (२२, लड्डा कॉलनी, परतूर, जालना) या दोघांना न्यायालयाने आज, गुरुवारी जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यतील आणखी एक आरोपी फतेहसिद्दिकी अहमद अन्सारी हा फरार आहे तर आणखी एक आरोपी अल्पवयीन आहे त्याच्याविरुद्ध बाल गुन्हेगारीविषयक न्यायालयात खटला प्रलंबित आहे.

या खटल्याचा निकाल आज जिल्हा सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी दिला. सरकारतर्फेअतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांनी काम पाहिले. मूळ फिर्यादीचे वकील सतीश गुगळे, पैरवी अधिकारी हवालदार एम. एच. थोरात व मुस्ताक शेख यांनी सरकारी वकिलांना सहाय्य केले. गुंड अझहर शेखविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी : शहरातील वाहतूक व्यवसायिक, मोटर विक्री दालनाचे व ‘लॉन्स’चे संचालक सय्यद अब्दुल करीम ऊर्फ करीम हुंडेकरी यांचे १८ नोव्हेंबर २०१९ च्या पहाटे ५.४० वा. मक्का मशीदमध्ये नमाज पठणासाठी जात असताना पांढऱ्या मोटारमधून आलेल्या चौघांनी अपहरण केले. रस्त्यात अपहरणकर्त्यांंनी झालेल्या झटापटीमुळे त्यांचा शर्ट फाटला आणि टोपी खाली पडली. नंतर ही टोपी नागरिकांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे दिली. त्या वेळी पहाटेच करीम हुंडेकरी यांच्या पत्नीच्या मोबाइलवर दोन ‘मिस कॉल’ आले तर अरुण झेंडे या व्यक्तीने करीम हुंडेकरी यांचा पहाटे ‘बचाव बचाव’ असा आवाज ऐकला होता. त्यांचा मुलगा सय्यद अफरोज अब्दुल करीम यांनी तक्रार केल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सायंकाळी औरंगाबाद रस्त्यावरील जेऊर  टोल नाक्याजवळ वाहनाच्या तपासणीमध्ये पोलिसांना करीम हुंडेकरी हे एसटी बस मधून परतताना आढळून आले. त्यानंतर करीम हुंडेकरी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अपहरण करणाऱ्या व्यक्तीमध्ये अजहर मंजुर शेख होता व तो मोटार चालवत होता. मोटारमध्ये त्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून करीम हुंडेकरी यांना शांत बसण्यास सांगितले. त्यानंतर औरंगाबाद रस्त्याने मोटार जालनाच्या पुढे  नांदेड रस्त्याला २५ ते ३० किमीवर एका मशिदीजवळ थांबवली. तेथे रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली व न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अपहरणकर्त्यांंनी पैसे हाजी नजीर शेख यांच्यामार्फत देण्यास सांगितले. परंतु हुंडेकरी यांनी नजीर शेख पैसे देणार नाही.

मुलांकडे पैसे मागितल्यास ते पोलिसांकडे तक्रार देतील, त्याऐवजी तुम्ही आता मला सोडा, सायंकाळपर्यंत १० लाख रुपये देतो. नंतर दोन-तीन दिवसांत जसे जमेल तसे पैसे देतो, अशी हमी दिल्याने अपहरणकर्त्यांंनी त्यांना सोडले व जालन्याहून नगरकडे येणाऱ्या बसमध्ये बसवून दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notorious goon azhar sheikh sentenced to life imprisonment zws
First published on: 23-04-2021 at 00:25 IST