सुडाचे, गुंडगिरीचे कोकणातील पर्व संपले आहे. आई जगदंबेने-भराडी मातेने भवानीमातेचा अवतार घेऊन राजकीय नरकासुराचा वध केला आहे. आता विकासाचे पर्व सुरू करू या, असे सांगताना कणकवलीत पुन्हा एकदा मोठी सभा घेऊन विकासाची चर्चा करू, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंगणेवाडी येथे जाहीर केले. आंगणेवाडी येथील देवी भराडीमातेच्या दर्शनासाठी आले असताना उद्धव ठाकरे बोलत होते. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, खा. राजन विचारे, खा. गजानन कीर्तिकर, खा. राहुल शेवाळे, खा.अरविंद सावंत, खा. चंद्रकांत खैरे, खा. आनंद अडसूळ, खा. शिवाजीराव आढळपाटील, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.
गोवा येथून उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात आले असता बांदा, कुडाळ, कणकवली, आंगणेवाडी अशा अनेक ठिकाणी वाजतगाजत त्यांचे स्वागत करण्यात आले. आंगणेवाडीत खासदारांसमवेत देवी भराडीमातेचे दर्शन घेऊन नवस फेडल्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते. ज्यांच्यामुळे दिल्ली जिंकली, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत.
कोकणात खासदार विजयी झाल्यास देवी भराडीमातेच्या दर्शनास वाजतगाजत येण्याचा केलेला नवस फेडला आहे, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, सुडाचे, गुंडगिरीचे पर्व संपले आहे. आता कोकणच्या विकासासाठी प्रत्येक क्षण वापरा, असे ठाकरे खा. विनायक राऊतांना उद्देशून म्हणाले.
कोकणचे मतदार हळवे, प्रेमळ आहेत. पोटनिवडणुकीत त्याचे दर्शन झाले होते. आता कोकणच्या विकासाचे नवस पुरे करू या. गेल्या आठ वर्षांपासून अरविंद भोसले यांनी शिवसेनेची सत्ता आल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही असे म्हटले. त्यांना उद्धव ठाकरे यांनी आता चप्पल घाला, डोळे खराब होतील असे सांगण्याचा प्रयत्न केला, पण भोसले यांनी, महाराष्ट्रात सत्ता आली तरच चप्पल घालणार असे सभेत जाहीर वचन दिले. विजयाचा भगवा फडकत राहू दे, कोणीही कितीही प्रयत्न केले तरी श्री देवी भराडी माते , भगवा फडकत राहू दे असे आवाहन करत तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार आहोत. कणकवलीत प्रचंड सभा घेऊन विकासाची चर्चा करू, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी खासदार विनायक राऊत, उद्योजक पुष्कराज कोले, जिल्हाप्रमुख वैभव नाईक, शैलेश परब तसेच पदाधिकाऱ्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले.