काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. भाजपा, मनसे आणि शिंदे गटाकडून राहुल गांधींविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. असे असताना आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकारण अधिकच चिघळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. त्यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी भाजपासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “आता भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला जोडे मारणार की राज्यपालांना?” ; संजय राऊतांचा संतप्त सवाल!

प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांना उद्देशून संजय राऊत म्हणाले, “आम्ही महाविकास आघाडीत गेलो, म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला आणि म्हणून तुम्ही पक्ष सोडला. इथेतर भाजपाने त्यांच्या राज्यपालाने अधिकृतपणे शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. शिवाजी महाराजांना माफीवीर म्हटलं आहे, तरीही तुम्ही सत्तेला चिकटून बसलेला आहात. महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतो आहे.”

हेही वाचा – “छत्रपतींनी जर माफी मागितली, तर मग पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात…”; संजय राऊतांचं विधान!

याचबरोबर “राज्यपालांनी एक वर्षात चारवेळा शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला आहे. तरीही हे सरकार गप्प आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह हे शिवाजी महाराजांना आदर्श मानतात, महाराष्ट्रात येऊन जयजयकार करतात आणि दुसरीकडे त्यांचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणतात की शिवाजी महाराजांनी पाचवेळा औरंगजेबाची माफी मागितली. ही भाजपाची अधिकृत भूमिका आहे का? नाहीतर भाजपाने महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे आणि राज्यपालांना तत्काळ इथून हटवलं पाहिजे.” अशी मागणीह संजय राऊतांनी केली.

हेही वाचा – “…नाहीतर जोडे काय असतात आणि कसे मारले जातात हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही”; संजय राऊतांचा इशारा!

याशिवाय “मला आश्चर्य वाटतंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी स्वाभिमानाचा नारा देत शिवसेना तोडली आणि भाजपासोबत सरकार बनवलं. आता त्यांच्या स्वाभिमान कुठे गेला?, भाजपा शिवाजी महाराजांचा उघडपणे अपमान करते आहे, आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला? तुम्ही राजीनामा द्या. अशा सरकारमध्ये तुम्ही का राहत आहत?, तुम्हाला खरोखरच शिवाजी महाराजांबाबत जरा जरी स्वाभिमान असेल, मग तुम्ही सरकारमध्ये का बसला आहात?” असा सवालही संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now where is your self respect sanjay raut asked chief minister shinde msr
First published on: 20-11-2022 at 12:47 IST