ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नागपुरात आंदोलन करणारे भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नागपूरच्या मानेवाडा चौकात बावनकुळे आणि शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न भाजपा नेत्यांनी केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून राज्यातील मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशाराही बावनकुळे यांनी आंदोलनादरम्यान दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलं आहे. या आंदोलनात बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदारही सहभागी झाले होते. रस्त्यावर बसून वाहतूक रोखून धरण्याचा प्रयत्न या आंदोलनादरम्यान करण्यात आला होता. नागपूरातल्या वर्दळीच्या मानेवाडा चौकातली वाहतूक साधारण अर्धा तास रोखून धरण्यात आली होती.कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांना बळजबरी करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

पोलिसी बळाचा वापर करुन ओबीसी आरक्षणासाठीचं आंदोलन चिरडलं जात असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. सध्या हे आंदोलन संपुष्टात आलं असलं तरी यापुढे शहराच्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. भाजपातर्फे राज्यभरातल्या विविध ठिकाणी आंदोलन छेडण्यात आलं आहे. नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक इथं भाजपा आक्रमक झालेलं दिसून आलं आहे.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obc reservation nagpur protest bjp leader chandrashekhar bawankule vsk
First published on: 15-09-2021 at 12:20 IST