अहिल्यानगर : राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीसाठी आदेश जारी केले आहेत. राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार ही पहिलीच निवडणूक असल्याचे आरक्षणासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

शिवाय सन २०११ च्या जनगणनेनुसार प्रभागरचना करण्यात आल्याने मागील निवडणुकीतील आरक्षणाची संख्या यंदाच्या निवडणुकीत कायम राहणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या ६८ पैकी १८ जागांवर ओबीसी, ९ जागांवर अनुसूचित जाती व एका जागेवर अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण असणार आहे.

मनपाची प्रभाग रचना अंतिम झाल्याने आता राजकीय पक्ष व त्यांच्या इच्छुकांना महापौर पद व प्रभागनिहाय आरक्षणाचे वेध लागले आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार पहिलीच निवडणूक ग्राह्य धरून लोकसंख्येवर आधारित अनुसूचित जाती व जमातीची आरक्षित सदस्य संख्या निश्चित करण्यात येणार आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या प्रभागापासून उतरत्या क्रमाने आरक्षित सदस्य संख्येइतक्या प्रभागात आरक्षण प्रस्तावित केले जाणार आहे.

शहरात अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रभाग ७ मध्ये सर्वाधिक असल्याने या प्रभागात ४ पैकी एका जागेवर अनुसूचित जमातीचे आरक्षण असणार आहे. तसेच, एकच जागा असल्यास आयोगाच्या आदेशानुसार मागील निवडणुकीत महिला आरक्षण असल्याने या निवडणुकीत महिला आरक्षण असणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मनपाच्या एकूण ६८ सदस्यांपैकी २७ टक्के म्हणजेच १८ जागांवर ओबीसी प्रवर्गास संधी मिळणार आहे. त्यात ५० टक्के महिला सदस्य असणार आहेत.

शहरात १७ प्रभाग असल्याने एका प्रभागात ओबीसी प्रवर्गासाठी २ जागा असणार आहेत. अनुसूचित जातीच्या ९ जागा असणार आहेत. यात ५ जागांवर महिला सदस्य असणार आहेत. एकूण ६८ जागांपैकी ३४ जागांवर महिला आरक्षण असेल. अनुसूचित जाती प्रवर्गात ५, ओबीसी प्रवर्गात ९ व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी २० जागा असणार आहेत. मागील निवडणुकीत सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी १९ जागा होत्या. यंदा अनुसूचित जमातीसाठी महिला आरक्षण नसल्याने सर्वसाधारण महिला प्रवर्गात एक जागा वाढणार आहे.

मनपाच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नगर शहर विधानसभा मतदारसंघातील प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम मनपा प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. दि. ६ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाईल. दिवाळी सणाच्या उत्सवाचे वातावरण दूर होऊन आता निवडणुकोत्सवाचे वातावरण तयार होऊ लागले आहे.