छत्रपती संभाजीनगर : रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील भरत महादेव कराड (वय ३५) या तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या भीतीने मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. या घटनंतर ओबीसी समाजातून हळहळ व्यक्त होत असून या तरुणांच्या नातेवाईकाची भेट घेण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ शुक्रवारी लातूर येथे पोहचले. भुजबळ यांनी मराठ्यांना दहा टक्क्यांचे विशेष आरक्षण नको का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. या आत्महत्येनंतर भुजबळही मराठवाड्यातील मराठा- ओबीसी संघर्षााच्या मैदानात पुन्हा उतरल्याचे दिसून येत आहे.
भरत कराड हे ऑटोचालक म्हणून उदरनिर्वाह करत होते. ते ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात गेल्या काही वर्षांपासून सक्रियपणे सहभागी झाले होते. सरकारने मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू करून ‘कुणबी’ म्हणून ओबीसी आरक्षणात सामील करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ओबीसींचे आरक्षण संपुष्टात येईल, या निषेधार्थ त्यांनी हा टोकाचा पाऊल उचलला.
नदीपात्रात उडी मारण्यापूर्वी त्यांनी “ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे”, “सरकार ओबीसी विरोधी आहे” अशा घोषणा दिल्या. काही तरुणांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रयत्न निष्फळ ठरले. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
भरत कराड यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत, “मी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सहभागी झालो. तरीही सरकारने ओबीसींचा घात करून जीआर काढला. त्यामुळे मी जीवन संपवत आहे. माझ्या बलिदानानंतर तरी समाजाला न्याय मिळावा” असे नमूद केले आहे.
भरत कराड यांच्या अंत्यसंस्कारावेळी गाव आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे”, “भरत कराड यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही” अशा घोषणा देत वातावरण संतप्त झाले. मागे आई, पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार असून कराड यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्या कुटुंबाकडे फक्त १० ते २० गुंठे जमीन असल्याची माहिती आहे. दरम्यान ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर छगन भुजबळ यांनी रेणापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त तरुणाच्या नातेवाईकांची भेट घेतली. मराठा समाजासाठी राज्य सरकारने मंजूर केलेले विशेष आरक्षण नको आहे, असा सवाल भुजबळ यांनी केला. मला याचे उत्तर मराठा समाजातील नेत्यांकडून हवे आहे, असे म्हणत भुजबळ यांनी जरांगे यांनाही टोला लगावला.