सोलापूरमध्ये ‘गयारामां’ना राष्ट्रवादी प्रवेशाचे वेध

आघाडी धर्मामुळे पक्षांतर कठीण

(संग्रहित छायाचित्र)

एजाज हुसेन मुजावर

राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून त्यातील प्रमुख भागीदार राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. सत्ताबदल झाल्यावर भाजप किंवा शिवसेनेचा आधार घेतलेल्या आयाराम-गयाराममधील गयारामांना ‘गडय़ा आपुलाच पक्ष बरा’ असे वाटू लागले आहे.

मोदी लाटेत २०१४ मध्ये राज्यात दोन्ही काँग्रेसची धूळधाण उडाली असता त्यात राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज ‘सत्ता तेथे विजय’ या न्यायाने भाजप वा शिवसेनेत दाखल झाले होते. विशेषत: २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या आधिपत्याखालील तत्कालीन महायुतीचे वर्चस्व राहिल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत स्वत:चे राजकीय अस्तित्व जपणे दोन्ही काँग्रेसमधील भल्या भल्या मंडळींना जिकिरीचे वाटत होते. त्यामुळे अनेकांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एक तर भाजपमध्ये किंवा शिवसेनेत जाणे पसंत केले होते. तत्कालीन महायुतीच्या विधानसभा निवडणुकीतील जागा समझोत्याचे सूत्र विचारात घेऊन ‘कोणी भाजप घ्या, कोणी शिवसेना घ्या’ अशा पद्धतीने पक्षांतरनाटय़ सुरू झाले होते. सोलापूर जिल्ह्य़ातही हे बहुअंकी राजकीय नाटय़ घडले. परंतु गेल्या वर्षभरात राज्यातील बदलत्या राजकीय वातावरणात असा साक्षात्कार अनेकांना होत आहे. विशेषत: पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादीच्या मंडळींची अशी बरीच घालमेल सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून यापूर्वी ओळखल्या गेलेल्या सोलापूर जिल्ह्य़ातही, राष्ट्रवादीच्या घरटय़ात परत फिरण्यासाठीची सुप्त राजकीय ओढ वाढल्याचे दिसत आहे. परंतु राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेल्यामुळे पुन्हा तेथून परत राष्ट्रवादीत माघारी येणे हे महाविकास आघाडी धर्मात बसत नाही. त्यामुळे शरीराने शिवसेनेत आणि मनाने राष्ट्रवादीत अशी ‘गयारामां’ची मानसिकता झाली आहे.

सोलापूर जिल्ह्य़ात यापूर्वी अनेक वर्षे राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे असे तीन गट होते. त्यातल्या त्यात जिल्हा ग्रामीणमध्ये मोहिते-पाटील तर सोलापूर शहरात सुशीलकुमार शिंदे यांचे वर्चस्व होते. शरद पवार यांनी ठरवून दिलेल्या सूत्रानुसार मोहिते-पाटील व शिंदे यांनी एकमेकांच्या क्षेत्रांमध्ये ढवळाढवळ करायची नाही, असा अलिखित करार होता. अगदी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होऊन सुशीलकुमार शिंदे हे जरी पूर्वीपासून काँग्रेसमध्येच राहिले असले तरी हा कराराचा सहसा भंग होत नव्हता. पवार-शिंदे यांच्यातील गुरू-शिष्याचे आणि मैत्रीचे नाते हा प्रमुख कार्यकारणभाव त्यामागे होता. दुसरीकडे जिल्ह्य़ात पवार व मोहिते-पाटील यांच्यातील सुरू राहिलेला सुप्त राजकीय संघर्ष २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर वाढला आणि अखेर अनेक मानापमान सहन केल्यानंतर शेवटी मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीशी असलेला घरोबा सोडून भाजपमध्ये जाणे पसंत केले. प्राप्त परिस्थितीत मोहिते-पाटील यांना स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठी भाजपमध्ये राहून पवार काका-पुतण्याशी दोन हात करणे भाग पडले आहे.

सोलापूर जिल्ह्य़ात बार्शीचे राष्ट्रवादीचे वजनदार नेते, माजी मंत्री दिलीप सोपल, करमाळ्याच्या नेत्या रश्मी बागल-कोलते यांसारखे मोहरे शिवसेनेच्या हाती लागले. शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेऊन विधानसभा निवडणुकीस सामोरे गेले; परंतु या मंडळींच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर सर्व गयारामांचे गणितच बिघडले आहे. राष्ट्रवादीपासून दुरावल्यानंतर दुसरीकडे शिवसेनेतही फारसे महत्त्व न राहिल्याने दिलीप सोपल, रश्मी बागल आदींना पुन्हा स्वगृही परतण्याची ओढ लागली आहे. परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना आघाडी धर्म सांभाळावा लागत असल्यामुळे शिवसेनेत गेलेल्या मंडळींना पुन्हा स्वगही प्रवेश देणे राष्ट्रवादीला अडचणीचे ठरले आहे. हीच अवस्था सोलापूर शहरातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची झाली आहे. आमदारकीचे घोडे गंगेत न्हाऊ घालण्यासाठी महेश कोठे हे २०१४ सालापूर्वी काँग्रेस सोडून शिवसेनेत दाखल झाले होते. दोन वेळा विधानसभा लढवूनही आमदारकी पदरात पडत नसल्यामुळे ते शिवसेनेत नाराज म्हणून ओळखले जातात. त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क वाढविला आहे. परंतु त्यांनाही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश मिळण्यासाठी आघाडी धर्माची अडचण सतावत आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनीही मागील विधानसभा निवडणूक दक्षिण सोलापुरातून लढविण्यासाठी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले होते. परंतु त्यांना अपयश आले. सध्या तेही शिवसेनेत सक्रिय दिसत नाहीत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Observation of ncp entry in solapur abn