CJI BR Gavai In Maharashtra Vidhan Sabha: भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून १४ मे रोजी शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन येथे त्यांना शपथ दिली होती. माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना हे १३ मे रोजी निवृत्त झाले होते. बी. आर. गवई हे आता २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत. दरम्यान, त्यांच्या या नियुक्ती निमित्त आज महाराष्ट्र विधीमंडळात त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी संविधान, लोकशाही आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. या भाषणादरम्यान सरन्यायाधीशांनी नागपूर येथील एका खटल्याची माहिती दिली. त्या खटल्यात ते महाराष्ट्र सरकारची बाजू मांडत होते. हे सांगत असताना, अधिकाऱ्यांबाबत बोलताना सरन्यायाधीशांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बघत, “अजित पवार, मला अधिकारी घाबरतात असे म्हणाले”, त्यांनी हे वाक्य उच्चारताच विधीमंडळात हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.

“मला जेव्हा जेव्हा संधी मिळते, तेव्हा मी भारतीय संविधानाची मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत अधिकारांचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो. ही तारेवरची कसरत असते. मी नेहमीच म्हणत आलो आहे की, मला हे पद देशाची व समाजाची सेवा करण्यासाठी दिलेली संधी आहे,” असे सरन्यायाधीश म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “मगाशी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, न्यायालयाच्या एका निर्णयामुळे नागपूरातील हजारो झोपडपट्टीवासीय बेघर होणार होते. एका विद्वान न्यायमूर्तींनी आदेश दिला होता की, आठ दिवसांत झोपडपट्ट्या पाडल्या नाहीत, तर जिल्हाधिकाऱ्याला तुरुंगात टाकण्यात येईल. मगाशी, मला वाटते अजित पवारांनी उल्लेख केला की, मलाही अधिकारी वगैरे घाबरतात. पण मी असे आदेश देत नव्हतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या या विधानानंतर व्यासपीठासह सभागृहात एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले. या विधानानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डोक्याला हात लावला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिलखुलास हसताना दिसले.