​सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील मडुरा गावात गेल्या सहा दिवसांपासून वावरणाऱ्या ‘ओंकार’ नावाच्या हत्तीने थेट श्री देव चव्हाटा मंदिरात जाऊन ‘देवदर्शन’ घेतल्याची एक अनोखी आणि अविश्वसनीय घटना शनिवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भक्तिभाव आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, हत्तीच्या सततच्या वास्तव्यामुळे शेतीचे नुकसान होत असल्याने वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी उपसरपंचांनी केली आहे.

​मंदिराच्या प्रवेशद्वारावर येऊन दिली सलामी:

​ओंकार हत्ती दिवसा शेती आणि लोकवस्तीजवळ फिरत असल्याने तो रात्रीच्या वेळी नेमका कुठे जातो, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता. मात्र, शनिवारी रात्री मडुरा परबवाडी येथे या हत्तीने थेट श्री देव चव्हाटा मंदिरात येऊन दर्शन घेतले. प्रथम तो मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचला आणि सुमारे दहा मीटर अंतरावर थांबला. ग्रामस्थांनी त्याला हाक दिल्यावर तो माघारी वळला, मात्र काही क्षणांतच तो पुन्हा मंदिरात गेला. हत्तीने मंदिराच्या प्रवेशद्वारावर येऊन ‘सलामी’ दिल्याचे दृश्य पाहून ग्रामस्थ थक्क झाले. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

मानवी सान्निध्य प्रिय; श्रद्धा आणि अद्भुत नात्याची चर्चा:

​ओंकार हत्तीने घेतलेले हे ‘देवदर्शन’ संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. या घटनेकडे श्रद्धा आणि निसर्गातील अद्भुत नात्याचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. हा हत्ती आता पूर्णपणे माणसाळल्यासारखा दिसत असून त्याला मानवी सान्निध्य प्रिय वाटू लागले आहे, असा समज स्थानिक ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे.

​गेल्या सहा दिवसांपासून हा हत्ती गावात फिरत असल्याने शेती बागायतीचे मोठे नुकसान होत आहे. मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. “वनविभाग केवळ फटाके लावून आणि रात्रीच्या वेळी बॅटरी दाखवून वेळ मारून नेत आहे. या हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी नेमकी यंत्रणा कधी येणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

​दरम्यान, वनविभागाला अद्याप हत्तीचा बंदोबस्त करण्यात यश आलेले नाही. मात्र, वनविभागाने ग्रामस्थांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.