राजापुर – मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर कोदवली येथे एका महिलेला कार मध्ये बसवून तीला लुटण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कार चालकाने या महिलेच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली असून त्या कार चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. ही घटना गुरुवारी सायंकाळी उशिरा घडली.
राजापूर कोदवली येथील बस थांब्यावर उभ्या असलेल्या रश्मी चव्हाण या महिलेने एका कार चालकाला हात दाखवून त्याला राजापुरात सोडण्याची विनंती केली. मात्र चालकाने महिलेला कार मध्ये बसवून तिला राजापुरात न उतरता पुढे नेत तिला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रकारांनतर महिलेने चालका बरोबर झटापट करुन तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत कारचालकाने महिलेच्या डोक्यावर लोखंडी रॉडचा वार केल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर कालचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
यावेळी या कार चालकाने महिलेच्या गळ्यातील दागिने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी जोरदार प्रतिकार केला. त्यांनी गाडीतून दरवाजा उघडून उडी मारली. महिलेने गाडीतून उडी मारल्यानंतर हा कारचालक पुन्हा गाडी मागे वळवून मुंबईच्या दिशेने फरार झाला. या घटनेत महिलेची पर्स व मोबाईल गायब झाला आहे. गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या या महिलेला तात्काळ स्थानिक रिक्षाचालक व ग्रामस्थांनी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल क्रण्यात आले आहे.
या प्रकरणी तात्काळ राजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अधिक तपास करत आहे. महामार्गावरील पेट्रोल पंप तसेच अन्य ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. दरम्यान ही व्हॅगनार कार असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान महामार्गावर भर दिवसा घडलेल्या या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.