एजाज हुसेन मुजावर

अवघ्या पाच-सहा वर्षांपूर्वी सोलापुरात हातपाय पसरलेल्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल अर्थात एमआयएम पक्षाची शहर जिल्हा शाखा फुटीच्या उंबरठय़ावर उभी आहे. मागील सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरलेल्या आणि तीन वर्षांपूर्वी सोलापूर महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची ताकद क्षीण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत एकाच वेळी नऊ नगरसेवक निवडून आणलेल्या एमआयएमच्या रूपाने घोंघावत आलेले वारे आले तसे परत फिरत असल्याची चिन्हे आहेत. वैचारिक निष्ठा आणि सामाजिक हितापेक्षा वैयक्तिक स्वार्थ, लबाडी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कार्यकर्त्यांना पाठीशी घातले तर काय होते, याची अनुभूती एमआयएम पक्षश्रेष्ठींना यानिमित्ताने येत असेल.

एमआयएमचे माजी शहराध्यक्ष, नगरसेवक तौफिक शेख हे गेली पाच वर्षे सोलापुरात पक्षाची धुरा वाहत होते. खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, गर्दी-हाणामारी आदी एक ना अनेक गुन्ह्य़ांची नोंद नावावर असलेले आणि एमपीडीएसारखी स्थानबद्धतेची कारवाईही झालेले तौफिक शेख हे शेजारील कर्नाटकातील विजापुरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यां रेश्मा पडेकनूर यांच्या हत्येप्रकरणी गेली दीड वर्षे तुरुंगात होते. हे हत्या प्रकरण घडेपर्यंत सोलापुरात ‘शेख बोले-पक्ष हाले’ अशी परिस्थिती होती. पक्षश्रेष्ठींनी पक्षाची संपूर्ण जबाबदारी शेख यांच्यावरच सोपवली होती; परंतु  हत्या प्रकरण घडले आणि त्यात शेख अडकले. परिणामी त्यांची राजकारणातील वाटचाल थांबली. एमआयएमला शेख यांना पर्यायी नेतृत्व हवे होते. ते फारूख शाब्दी यांच्या रूपाने मिळाले. यापूर्वी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघात एमआयएमकडून तौफिक शेख यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेताना काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना अक्षरश: जेरीस आणले होते. त्या वेळी थोडक्या मतांनी प्रणिती शिंदे यांना निसटता विजय मिळविता आला होता. पराभव झाला तरी मिळालेल्या मतांच्या जोरावर तौफिक शेख यांनी पुढे २०१७ सालच्या सोलापूर महापालिका निवडणुकीत ताकद पणाला लावली होती. त्या वेळी त्यांच्यासह पक्षाचे नऊ नगरसेवक निवडून आले होते. तत्कालीन सत्ताधारी दोन्ही काँग्रेसला मोठा फटका बसला होता. काँग्रेसला अवघ्या १४ जागांवरच समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था तर आणखी शोचनीय होऊन या पक्षाच्या पदरात फक्त चारच जागा पडल्या होत्या. एमआयएमने दोन्ही काँग्रेसचे नुकसान केले असता त्या परिस्थितीचा पुरेपूर लाभ मिळवत भाजपने प्रथमच महापालिकेची सत्ता हस्तगत केली होती. एकंदरीत, शहराच्या राजकारणात एमआयएम अर्थातच तौफिक शेख यांचा दबदबा वाढला होता.

तौफिक शेख तुरुंगात असताना फारूख शाब्दी यांनी पक्षावर मजबूत पकड ठेवण्याचा प्रयत्न के ला. अशाही स्थितीत बिथरलेल्या शेख समर्थकांनी शाब्दी यांना अडचणीत आणण्यासाठी हाणामारी केली होती; परंतु एव्हाना, एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असिदोद्दीन ओवैसी यांच्याकडे पक्ष निरीक्षकांनी अहवाल पाठविला आणि फारूख शाब्दी यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याची भूमिका ओवैसी यांनी कृतीत आणली. त्यामुळे शाब्दी यांचा प्रभाव आणखी वाढला असताना दुसरीकडे तौफिक शेख हे पक्षापासून दुरावत गेले. शेख तुरुंगातून सुटून आले तरी पक्षाकडून साधी विचारणाही झाली नाही. त्यामुळे शेख यांना राजकीय निर्णय घेण्याची वेळ आली.

पक्षात डावलले जात असल्याची भावना झाल्यानेच तौफिक शेख यांनी आपल्या सहा नगरसेवकांसह मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीसाठी विद्या लोलगे या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्तीने पुढाकार घेतला होता. पवार यांची भेट घेईपर्यंत इकडे सोलापुरात राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही काही खबरबात नव्हती. शेख यांना राष्ट्रवादीत प्रवेश द्यायचा की नाही, याचा निर्णय लवकरच होणार असल्याचे सांगण्यात आले. शेख यांनी या संदर्भात लवकरच नवी बातमी मिळेल, असे संकेत दिले आहेत. शेख यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहूनच त्यांना पक्षात पावन घेण्याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीला घ्यावा लागणार आहे.

सोलापूरच्या राजकारणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे तत्कालीन विश्वासू सहकारी विष्णुपंत कोठे यांनी सर्वप्रथम तौफिक शेख आणि त्यांचे बंधू आरीफ शेख यांची उपयुक्तता तपासून राजकारणात आणले आणि त्यांना ताकद दिली होती. त्या अर्थाने दोघे शेखबंधू विष्णुपंत कोठे यांचे शिष्य. एक भाऊ भाजप, तर दुसरा एमआयएममध्ये सामील झाले. तौफिक शेख हे आता एमआयएमला धक्का देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

सोलापूरमध्ये एमआयएम पक्षाची मजबूत बांधणी केली होती. त्यातून यशही मिळाले. त्याचा परिणाम म्हणूनच मला हत्येच्या खोटय़ा गुन्ह्य़ात गोवले गेले. दुर्दैवाने एमआयएम पक्षश्रेष्ठींनी पाठबळ दिले नाही. आता वेळ निघून गेली आहे. माझे जे चांगले-वाईट काम आहे ते लोकांसमोर आहे. एमआयएमवर नाराजी कायम असून सामाजिक हित लक्षात घेता पुढील राजकीय निर्णय घेण्याची वेळ आली आहे. सात नगरसेवकांना बरोबर घेऊन निर्णय घेतला जाईल.

– तौफिक शेख, एमआयएमचे बंडखोर नेते