सोलापूर : दरातील घसरण, निर्यात बंदीपाठोपाठ बिघडलेल्या हवामानामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याची एक लाखांहून अधिक क्विंटलची उच्चांकी आवक झाली. यामुळे दरात आणखी घसरण होत क्विंटलला जेमतेम हजार ते तेराशे रुपये दर मिळाला. दुसरीकडे आवक प्रमाणाच्या बाहेर झाल्यामुळे अखेर दोन दिवसांसाठी लिलाव बंद करण्यात आले.

गेल्या नोव्हेंबरपासून कृषी बाजारात कांदा दाखल होत आहे. केंद्र सरकारने केलेली कांदा निर्यातबंदी, अतिवृष्टी, ढगाळ वातावरण, त्यातच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे शून्य नियोजन यामुळे कांदा दर घसरणीची मालिका सुरूच आहे. ६ जानेवारी रोजी ९२ हजार ३६९ क्विंटल कांदा दाखल झाला असता दर १२०० ते १७०० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. त्यानंतर सोमवारी दाखल झालेल्या ९६ हजार ६७३ क्विंटल कांद्याला प्रतिक्विंटल १२०० ते १४०० रुपये दर मिळू शकला. तर मंगळवारी कांदा आवक एक लाख क्विंटलपेक्षा जास्त झाली असता दर घरसण आणखी सुरूच राहून जेमतेम एक हजार ते १३०० रुपयांपर्यंतच दर देऊन शेतकऱ्यांची बोळवण करण्यात आली.

हेही वाचा >>>नीट-पीजी ७ जुलैला,वेळापत्रकात बदल

यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. उद्या गुरुवारी कांदा लिलाव बंद राहणार असून त्यानंतर पुन्हा सलग तीन दिवस लिलाव होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कांदा निर्यातबंदी आणि अवकाळी पावसामुळे अस्मानी संकट अशा दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांची आणखी किती लूट होणार हे माहीत नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापाऱ्यांसाठी? शेतकऱ्यांच्या हाती धतुरा आणि व्यापारी व प्रशासनाच्या हाती मलिदा, अशी दयनीय अवस्था आहे. – अनिल कुंभार, शेतकरी, झरेगाव, ता. बार्शी