प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या तीन पायाभूत चाचण्यांऐवजी यंदाच्या वर्षी दोन पायाभूत चाचण्या घेण्यात येणार आहेत. दुसरी पायाभूत चाचणी ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित होती. पण त्यास विलंब झाला आता डिसेंबर महिन्यात त्याचे आयोजन करण्याची योजना होती. परंतु डिसेंबर महिना हा शाळांमधील वार्षिक स्नेहसंमेलन, वार्षिक क्रीडा महोत्सव आदी शालेय उपक्रमासाठी व्यस्त असतो. यामुळे डिसेंबर महिन्यात दुसरी पायाभूत चाचणी घेतल्यास त्याचा अतिरिक्त बोजा शिक्षकांच्या कामकाजावर पडेल. त्यामुळे डिसेंबरमध्ये ही परीक्षा घेण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी लोक प्रतिनिधी, शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना, पालक संघटना यांनी केली होती त्यामुळे डिसेंबरमध्ये होणारी पायाभूत चाचणी यावर्षीसाठी रद्द करण्यात आली आहे, असे निवेदन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले.
डिसेंबर महिन्यात होणारी पायाभूत चाचणी यावर्षी रद्द करावी, असा मुद्दा विधानसभेत अनेक लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. त्यावेळी निवेदन करताना विनोद तावडे यांनी सांगितले की, शिक्षण विभागाच्या वतीने तीन पायाभूत चाचण्या घेतल्या जातात. या पायाभूत चाचण्या घेण्याच्या प्रक्रियेसाठी आधीच्या प्रथेप्रमाणे दरकरार काम दिले जायचे. दरम्यान मंत्रिमंडळाच्या बैठकीत ई-टेंडरिंगची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जुलैमध्ये होणारी पायाभूत चाचणी प्रत्यक्ष सप्टेंबरमध्ये घेण्यात आली. तसेच दुसरी चाचणी ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार होती. ही चाचणी डिसेंबरमध्ये घेण्याचे ठरविण्यात आले. परंतु वरीलप्रमाणे उल्लेख केल्यानुसार डिसेंबर महिन्यात शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येते. त्यामुळे यंदा ही चाचणी रद्द करण्यात येत असून तसे निर्देश राज्यातील शाळांना देण्यात आले असून यंदाच्या वर्षी तीन पायाभूत चाचण्यांच्या दोन पायाभूत चाचण्या होतील.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2015 रोजी प्रकाशित
चालू शैक्षणिक वर्षांत तीनऐवजी दोनच पायाभूत चाचण्या
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली.
Written by विश्वनाथ गरुड

First published on: 11-12-2015 at 17:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only two examinations in this academic year in maharashtra