समाजकल्याण विभागाचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे संकेतस्थळ शनिवारी अचानकपणे बंद पडले. त्यामुळे सुमारे ३५ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरताना अडचणी निर्माण झाल्या. शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी शिक्षणसंस्था व विद्यार्थ्यांमधून होत आहे.
सहा महिन्यांच्या कालावधीनंतर शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, संकेतस्थळ बंद असल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली. समाजकल्याण अधिकारी जागेवर बसत नसल्याचीही ओरड आहे. हे पद रिक्त असल्याने प्रभारी अधिकाऱ्याकडे हा कारभार होता. तीन दिवसांपूर्वी सुरू झालेले संकेतस्थळ शनिवारी दुपारी पुन्हा बंद झाले. त्यामुळे तुळजापूर व उस्मानाबाद जिल्हय़ातील ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम रखडले. दुसऱ्या सत्रासाठी परीक्षा अर्ज भरण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.  शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया अजूनही अपूर्ण आहे. या अनुषंगाने शिक्षण संस्थांनी ओरड केल्यानंतर २३ डिसेंबर रोजी संकेतस्थळ सुरू करण्यात आले. मात्र, हे संकेतस्थळ  रात्री १०.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत चालते. या काळात जागरण करून काम करावे लागते. ऑनलाईनची ही न्यारी दुनियादेखील कर्मचारी हसत खेळत जगत असताना संकेतस्थळ पुन्हा बंद पडले.