सत्तेच्या १५ वर्षांच्या काळात आघाडी शासनाने काय केले आणि आमच्या अडीच वर्षांच्या काळात काय केले यावर खुल्या व्यासपीठावर चच्रेला यावे, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इस्लामपूरच्या यल्लमा चौकात झालेल्या शेतकरी मेळाव्यात केले. या वेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी नाव न घेता स्वाभिमानीतील संघर्षांबाबत बोलताना, सदाभाऊची गोफण तुटेल, पण शेतकऱ्यांच्या पिकाला हात लावू देणार नाही असा इशारा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इस्लामपूरसाठी भुयारी गटार योजना आणि क्रांतिसिंह नाना पाटील कृषी महाविद्यालय मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचा नागरी सत्कार आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव िशदे यांचे चिरंजीव वैभव िशदे यांचा भाजपा प्रवेश असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या वेळी बोलताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, की आघाडी शासनाच्या कालावधीत आणि युती शासनाच्या काळात शेतकरी हिताचे किती निर्णय झाले याची खुल्या व्यासपीठावर येऊन चर्चा करावी. कोणाचे बरोबर, कोणाचे चूक याचा फैसला जनताच करेल. जनता सुज्ञ असल्याने नगरपालिका, महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला एक नंबरचा पक्ष म्हणून जनतेने सत्ता दिली आहे.

मुख्यमंत्री गाळ काढत फिरत असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत, मात्र विरोधकांनी केलेला गाळ काढण्याचे काम आम्ही करीत आहोत. गेली १५ वष्रे सिंचन योजनावर खर्च केलेला निधी गाळात गेला आहे. अनेक सिंचन योजना बंद पडल्या. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निधी उपलब्ध करून दिला असून यातून रखडलेल्या योजनांना गती देण्याचे काम आमच्या शासनाने केले आहे.

गेल्या अडीच वर्षांत फार मोठे परिवर्तन केल्याचा दावा आमच्या शासनाचा नाही. मात्र प्रामाणिक प्रयत्न करीत असल्यानेच विविध निवडणुकीत लोकांनी विश्वास व्यक्त केला असून त्याला तडा जाऊ दिला जाणार नाही. विरोधकांनी टीका करण्यापेक्षा जलयुक्त शिवार योजनेत श्रमदान केले तर शेतकरी वर्गाला त्याचा लाभ होईल.

राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते आ. जयंत पाटील यांनी बाहुबली कोण आणि कट्टाप्पा कोण, याची विचारणा केली होती. याचा संदर्भ घेत मुख्यमंत्री यांनी फारशी चर्चा न करता पक्षप्रवेश करून भाजपात आलेले दोन बाहुबली सामना करण्यास समर्थ असल्याचे सांगून चच्रेला पूर्णविराम दिला.

या वेळी बोलताना राज्यमंत्री खोत म्हणाले, की गेली ३० वष्रे मी शेतकरी हितासाठी काम करीत असून आजही संघर्षांची आणि दोन हात करण्याची माझी तयारी आहे. आतापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीशी दोन हात केले. सामान्य घरातील मी कार्यकर्ता असून मी शेतकरी आहे. रानात कधी नांगर धरायचा, घात आल्यावर पेरणी करायची याची माहिती मला आहे. मात्र उभ्या पिकातील कणसाची राखण करीत असताना गोफण तुटली तरी सदाभाऊ मागे हटणार नाही.  या मेळाव्यात प्रारंभी भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी स्वागत तर नगराध्यक्ष श्री. पाटील यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालक तथा सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय िशदे आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Open discussion development work cm devendra fadnavis congress ncp
First published on: 30-05-2017 at 03:13 IST