राजर्षी शाहू महाराजांच्या गुरुवारी होणाऱ्या जयंतीच्या कार्यक्रमात मंत्र्यांच्या सहभागावरून वाद सुरू झाला आहे. त्यांचे जन्मस्थळाचे काम गेली ३ वर्षांपासून सुरू असून अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. राजर्षी शाहू जन्मस्थळाच्या कामाबाबत शासकीय यंत्रणेची अनास्था दिसून येत असल्यामुळे या वर्षी जयंती मंत्र्यांच्या हस्ते साजरी न करता ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते साजरी करावी, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली. तर टोलविरोधी आंदोलनाची दखल पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतलेली नाही. त्यामुळे शाहूंच्या जयंती समारंभास हजर राहण्याचा नतिक अधिकार त्यांना नाही. अशी टीका करून लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेमी जनता या संघटनेच्या वतीने पालकमंत्री हजर राहिल्यास त्यांचा वेगळ्या प्रकारे निषेध करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
लोकराजा शाहू महाराज यांच्या जयंतीचे कार्यक्रम शहर व जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरे करण्याचे नियोजन झाले आहे. तर दुसरीकडे शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या कामकाजातील दोषावरून प्रजासत्ताक संघटनेने आक्षेपाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. संघटनेचे अध्यक्ष देसाई म्हणाले, जन्मस्थळाची जागा अजूनही खासगी मालकांच्या नावावरच आहे. कमानीचा निधी जागेअभावी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पडून आहे. मूळ मालकाने जागेबाबत हरकत घेतल्यास जन्मस्थळाच्या कामावर केलेला खर्च वाया जाऊ शकतो. कमानीसाठी लागणारे पसे आहेत पण शासनाकडून जागा देण्यात आली नसल्याने ते काम थांबलेले आहे. राजर्षी शाहू जन्मस्थळासाठी जी जागा आरक्षित आहे, ती योग्य आहे का याचे मोजमाप झालेले नाही. ऐतिहासिक वास्तूच्या शेजारी मोठय़ा इमारती बांधण्यासाठी परवानगी नसते, पण येथे मोठय़ा इमारती बांधल्या जात आहेत. बिल्डरचा फायदा होण्यासाठी याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत तत्काळ चौकशी करून त्वरित भूखंड शासनाच्या नावावर करण्यात यावा अशी मागणी केली. या वेळी सचिव बुरहान नाईकवडी उपस्थित होते.
पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गेली चार वर्ष टोल विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्याने लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेमी जनता या संघटनेच्या वतीने त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. अशोक पोवार, कॉ. चंद्रकांत यादव, संभाजीराव जगदाळे, सुभाष देसाई, वसंत मुळीक, बाबा पार्टे, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, गाणी आजरेकर, मदन चोडणकर, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रशांत कुरणे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रकाद्वारे भूमिका मांडली आहे.
पत्रकात म्हटले आहे, की टोल रद्द करण्यासाठी कृती समितीने सुचविलेल्या मागण्या, पर्याय यांबाबत कधीच चर्चा देखील केली नाही. म्हणजेच राजर्षी शाहू महाराजांच्या प्रजेला त्रास देणाऱ्या आयआरबीला एकप्रकारे प्रोत्साहन देण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे शाहूंच्या कार्यक्रमाला हजर राहण्याचा त्यांना नतिक अधिकार नाही. जिल्हा प्रशासनानेही पालकमंत्र्यांना निमंत्रित न करता कोल्हापुरातील एखादी शाहू विचारांच्या किंवा जनतेचे प्रतिनिधी असणारे महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते हा कार्यक्रम साजरा करावा अशी मागणीही यामधून करण्यात आली आहे.