रवींद्र केसकर

धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या चरणी भाविकांनी मोठ्या श्रध्देने अर्पण केलेले सोन्या-चांदीची दागिने वितळविण्यास विधी व न्याय विभागाने मंजुरी दिल्यानंतर आता नियमावली तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. २००९ ते २०२२ या काळात भाविकांनी अर्पण केलेले २०७ किलो सोने व दोन हजार ५७० किलो चांदीचे दागिने वितळविण्यासाठी शिर्डी येथील साईबाबा संस्थानकडून जशी प्रक्रिया अवलंबली जाते, त्याच पारदर्शी पध्दतीने तुळजाभवानी मंदिर संस्थानची नियमावली तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सात सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून ही समिती शिर्डी संस्थानला रवाना झाली आहे.

राज्यासह परराज्यातील भाविकांनी तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू आणि तुळजाभवानी देवीच्या अंगावरील पुरातन दागदागिने, असे दोन स्वतंत्र खजिने मंदिरात आहेत. त्यापैकी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तू वितळवून एकत्र करून बँकेत ठेवण्याबाबतचा ठराव तुळजाभवानी मंदिर समितीने जुलै २०२३ आणि ऑगस्ट २०२३ रोजी घेतला होता. त्यानुसार मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी शासनाने रितसर परवानगी मागीतली होती. शासनाच्या नियंत्रणाखाली असलेल्या साईबाबा संस्थान आणि सिध्दीविनायक गणपती मंदिर यांच्याप्रमाणे विहित प्रक्रिया राबवून सोन्या-चांदीची दागिने वितळविण्यास काही अटी आणि शर्ती घालून शासन मान्यता देण्यात आली.

आणखी वाचा-सोलापूर : पोलीस ठाण्याच्या पाठ भिंतीला लागून असलेल्या वन वसाहतीत घरफोडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुळजाभवानी देवीच्या दैनंदिन व यात्रा काळात वापराचे दागिने, असामान्य कलाकुसरीचे पुरातन व दुर्मिळ दागिने वगळून मंदिर समितीच्या बैठकीतील ठरावानुसार केवळ भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू वितळविण्यास मान्यता देण्यात आली आहे. जतन करून ठेवावयाचे दागिने वगळता किमान १० किलो एवढ्या वजनाचे दागिने साठल्यानंतरच वितळविण्यासाठीची कार्यवाही हाती घेण्यात यावी, असेही या आदेशात नमुद केले आहे. तत्पूर्वी तीन सदस्यांनी त्याची पाहणी करावी, वजन करण्यापूर्वी वस्तूंवरील खडे काळजीपूर्वक काढून घेण्यात यावेत आणि मोहोरबंद पिशवीत ते दागिने ठेवण्यात यावेत. दागदागिन्यांची वाहतूक करण्यापूर्वी त्याचा वाहतूक विमा काढण्यात यावा, पोलीस संरक्षणाची व्यवस्था करावी, वितळविल्यानंतर आलेल्या अशुध्द तुटीतील दोन तुकडे ताब्यात घेण्यात यावेत आणि इंडिया गव्हर्नमेंट मिट यांच्याकडून त्याची तपासणी करण्यात यावी, असेही या आदेशात म्हटले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी सात सदस्यीय समिती गठीत केली आहे. यात तुळजाभवानी देवीचे महंत, पुजारी मंडळांचे सदस्य, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांचा समावेश आहे. ही समिती शिर्डीच्या साई संस्थानकडून अंमलात आणलेल्या दागिने वितळविण्याच्या नियमांचा अभ्यास आणि प्रक्रियेचा अभ्यास करून तुळजाभवानी मंदिर संस्थानसाठी स्वतंत्र नियमावली तयार करणार आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली महिनाभरात स्वतंत्र नियमावली तयार करूनच हे दागिने वितळविले जाणार आहेत.