मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं असलं तरीही जिल्ह्यांतर्गत दौरे सुरू केले आहेत. त्यामुळे या आरक्षणाच्या मागणीला जोर आला असून आंदोलन अधिक धारदार होत आहे. दरम्यान, या दौऱ्यांमध्ये मनोज जरांगे पाटलांनी ओबीसीच्या नेत्यांनाही टार्गेट केलं आहे. यामध्ये छगन भुजबळांचाही क्रमांक आहे. छगन भुजबळांना मराठ्यांनी मदत केली असं म्हणत त्यांनी आता मराठ्यांच्या बाजूने उभं राहावं अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे. या सर्व टीकांवर छगन भुजबळांनी आज प्रतिक्रिया दिली.

छगन भुजबळ म्हणाले की, “मराठा समाजाला आरक्षण देण्याला मी विरोध केलाच नाहीय. पण ओबीसींचं आरक्षण फार कमी आहे. लोकसंख्या खूप जास्त आहे. पावणेचारशे जाती आहेत. १७ टक्के आरक्षण शिल्लक राहिलेलं आहे. म्हणून त्यांना (मराठा) वेगळं आरक्षण द्या, असं माझं मत आहे.”

हेही वाचा >> “मराठ्यांनी छगन भुजबळांना खूप मदत केली, अन् आता…”, मनोज जरांगे पाटलांनी घेतला समाचार

“पण हे माझं एकट्याचं मत नाही. सगळीच मंडळी त्याच मताची आहेत. मी काही एकटा त्या मताचा नाही. पण मला एकट्यालाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. हे सगळ्यांच्या बाबतीत बोला. नाहीतर त्याला राजकारणाचा वास येईल हे लक्षात ठेवा”, असा इशाराही भुजबळांनी यावेळी दिला.

राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणासाठी समाज रस्त्यावर उतरला आहे. सर्वांनीच आरक्षणाची मागणी लावून धरल्याने सरकारही कोंडीत सापडलं आहे. ५० टक्के आरक्षणाची मर्यादा जवळपास संपत आल्याने कोणाला किती आणि कशाचा आधारवर आरक्षण द्यायचं याबाबत सरकार पातळीवर चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चांमध्ये राजकीय नेते मंडळींमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.