अहिल्यानगर: शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस जिल्ह्यातील पाच तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीने ३८० गावांतील तब्बल १ लाख ९ हजार १६१ हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांचे नुकसान झाले. याचा फटका १ लाख ५४ हजार ३०९ शेतकऱ्यांना बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला. या पावसाने आलेल्या पुरात तीनजण पाण्यात वाहून गेले तर १३७ जनावरे दगावली आहेत. १५३ घरांची पडझड झाली आहे.
सर्वाधिक फटका शेवगाव व पाथर्डी तालुक्याला बसला आहे. यासह कर्जत, नेवासा, अहिल्यानगर, श्रीगोंदा तालुक्यात शेतकऱ्यांचे व नागरिकांचे नुकसान झाले तर काल, सोमवारी श्रीरामपूर तालुक्यात या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. सर्वाधिक शेवगाव तालुक्यात ११३ गावे बाधित झाली असून ५१ हजार ९९३ हेक्टर क्षेत्रातील कापूस, तूर, उडीद, मूग, कांदा, बाजरी, सोयाबीन व भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा फटका ६९ हजार १९३ शेतकऱ्यांना बसला आहे.
पाथर्डी तालुक्यात ११४ गावांमधील ४९ हजार ८१८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ६९ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सर्वच क्षेत्र ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसानीचे आहे. यात बाजरी, कापूस, तूर, मूग, उडीद, डाळिंब, संत्रा, सीताफळ या पिकांचा समावेश आहे. नेवासा तालुक्यात ६५ गावांमधील ६ हजार १३६ हेक्टर क्षेत्रावरील कापूस, तूर, मका, कांदा, बाजरी, सोयाबीन व भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले असून १३ हजार ५०१ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.
हे सर्वच क्षेत्र ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे तर कर्जत तालुक्यात ६५ गावांमध्ये जोरदार झालेल्या पावसात ८२० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. त्यात २ हजार १२० शेतकऱ्यांचे कांदा, तूर, मका, बाजरी व फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सर्व पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्षात किती नुकसान झाले याची आकडेवारी समोर येणार आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील २३ गावांना काल सोमवारी पावसाने झोडपले असून ३९४ हेक्टर क्षेत्रातील कापूस, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा फटका ४९५ शेतकऱ्यांना बसला आहे. हे सर्व क्षेत्र ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसानीचे आहे.
१५३ घरांची पडझड
या पावसामुळे अहिल्यानगर, पाथर्डीमध्ये आलेल्या पुरामध्ये तीन जण वाहून गेले, त्यातील पाथर्डीतील दोघांचा शोध आज, मंगळवारी दुपारपर्यंत लागलेला नव्हता. जिल्ह्यातील १३७ पशुधन दगावले व १५३ घरांची पडझड झाली. पाथर्डीत ३५ मोठी जनावरे, ९३ लहान जनावरे मृत्युमुखी पडली व ४३ घरांची पडझड झाली. त्यातील तीन जनावरे वीज पडून तर ९७ जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. सहा जनावरे घरांच्या भिंती पडून दगावली. नगर १, अकोले १, जामखेड ६, कर्जत १७, नेवासा २६, पारनेर ३, राहुरी ११, संगमनेर २, शेवगाव ३८, श्रीगोंदे २, श्रीरामपूर ३, नेवासात ४, पारनेरमध्ये एका घराची पडझड झाली.