अलिबाग : बेताची आर्थिक परिस्थिती सोयीसुविधांचा अभाव यासारख्या असंख्य अडचणींवर मात करत रायगड जिल्ह्यातील महाडच्या रोशनी रविंद्र पारधी हिने आगामी क्रिकेट हंगामासाठी महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात स्थान मिळवले आहे. कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे १६ व्या वर्षी महाराष्ट्र महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. राज्याच्या महिला क्रिकेट संघात स्थान मिळवणारी ती रायगडची पहिली महिला क्रिकेट खेळाडू ठरली आहे.

रोशनी पारधी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन व महाडच्या एसबीसी क्रिकेट अकॅडमीची अष्टपैलू क्रिकेट खेळाडू आहे. जलदगती गोलंदाज तसेच सलामीची फलंदाज आहे. रोशनीने यापुर्वी पंधरा, सतरा आणि एकोणीस वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे. गतवर्षी झालेल्या आंतरजिल्हा पंधरा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत रोशनी पारधी हिने लागोपाठ तीन शतके झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

जलदगती गोलंदाज आणि सलामीवीर फलंदाज म्हणून तिने रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. रायगड संघातून आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत खेळताना आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर रोशनीने आजवर अनेक शतके झळकावली तसेच अनेक फलंदाज बाद केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध वयोगटाच्या संघात तिची निवड झाली. आता तिची महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला संघात निवड झाली आहे.

रोशनीला लहानपणापासून क्रिकेट खेळण्याची आवड होती. तिची आवड लक्षात घेऊन तिच्या वडिलांनी तिला प्रोत्साहन दिले. शालेय स्तरावर चांगली कामगिरी केल्याने महाड येथील एस क्रिकेट अकादमीने तिला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. मिळालेल्या संधीचे तिने सोने केले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शालेय जिल्हास्तरीय आणि विभागीय पातळीवर झालेल्या क्रिकेट स्पर्धांमध्ये तिने आपले कर्तृत्व सिद्ध केले.

हेही वाचा

रोशनी हिचे वडील रवींद्र पारधी, एसबीसी क्रिकेट अकॅडमी महाडचे अध्यक्ष बशीर चिचकर व प्रशिक्षक आवेश चिचकर यांनी तिची महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघात निवड झाल्या बद्दल आनंद व्यक्त केला आहे. तर रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (आरडीसीए) अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक, आरडीसीएचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सदस्य यांनी तिचे अभिनंदन केले .