गेल्या काही दिवसांपासून राज्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा काही भागांमध्ये जाणवू लागल्याची तक्रार केली जात आहे. करोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची मागणी वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे काही भागांमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढली असून अतिरिक्त पुरवठ्याची मागणी केली जात आहे. ही वाढती मागणी पुरवण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ऑक्सिजनचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी १०० टक्के ऑक्सिजन उत्पादन हे वैद्यकीय गरजेसाठी करावं, असे आदेश या कंपन्यांना देणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे सांगितलं. त्यामुळे राज्यात करोना रुग्णांसाठी अतिरिक्त ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१२ हजार ०८७ मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन

राज्यातील ऑक्सिजनची स्थिती आणि आगामी काळात वाढू शकणारी मागणी याविषयी राजेंद्र शिंगणे यांनी माहिती दिली. “गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात काही ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. राज्यात अनेक कंपन्या ऑक्सिजनचं उत्पादन करत असल्या, तरी ७ ते ८ कंपन्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन बनवतात. त्यांना टँकर्स, वाहतूक यासंदर्भात सरकारकडून लागेल ती मदत दिली जात आहे. राज्यात १२०८७ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होते. त्यापैकी ९२३ मेट्रिक टन ऑक्सिजन गेल्या आठवड्यात वापरला गेला होता. रुग्णांच्या संख्येसोबत ऑक्सिजनचा वापर वाढणार आहे. आज होणाऱ्या उत्पादनात फार वाढ होईल, असं वाटत नाही. त्यामुळे इतर राज्यांमधून त्याच्या पुरवठ्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मध्य प्रदेशमधून पुरवठा सुरू झाला आहे. गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांमधून देखील ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे”, अशी माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

राज्यात करोनानं नवं आव्हान उभं केलं! ऑक्सिजन पुरवठ्याची स्थिती चिंताजनक!

“सध्या आपण ८० टक्के मेडिकल ऑक्सिजन आणि २० टक्के उद्योगांसाठी ऑक्सिजन तयार करावा अशा सूचना दिल्या आहेत. मात्र, आता १०० टक्के मेडिकलसाठी ऑक्सिजन उत्पादन करण्याच्या सूचना आम्ही त्यांना देणार आहोत”, असं शिंगणे म्हणाले. “ऑक्सिजनचं नव्याने उत्पादन करायचं असेल, तर त्यासाठी वेळ आणि मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागतं. रुग्णसंख्या वाढीचा दर असाच राहिला, तर येत्या १० ते १५ दिवसांत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्सिजनचं उत्पादन वाढवावं लागेल. त्यामुळे पुढे लागणारा ऑक्सिजन इतर राज्यांतून मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत”, असं देखील शिंगणे यांनी सांगितलं.

More Stories onकरोनाCorona
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oxygen production for business to be stopped says minister rajendra shingne pmw
First published on: 09-04-2021 at 14:05 IST