राज्यात अद्यापही करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दररोज मोठ्यासंख्येने रूग्ण आढळून येत आहेत. परिणामी आरोग्य यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र आहे. रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर, बेड आदींचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकारकडून यासाठी वेळोवेळी केंद्राकडे मदत देखील मागितली जात आहे. मात्र करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे हा पुरवठा देखील अपुरा पडत आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना राज्यातील ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवरून एक सूचक इशारा दिल्याचं दिसून आलं आहे. ”रूग्ण वाढ अधिक झाली तर मोठी अडचण निर्णाण होण्याची शक्यता आहे.” असं त्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री म्हणाले, ”ऑक्सिजन एवढ्या मोठ्याप्रमाणावर लागातोय, की ऑक्सिजन जर आता नाही मिळाला तर काय होईल? असा प्रश्न निर्माण होतोय. आपल्या राज्याची रोजची ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता ही साधरणपणे १२०० मेट्रीक टन आहे. आजपण साधरणपणे १७०० मेट्रीक टन ऑक्सिजन वापरतो आहोत. केंद्राने आपल्याला १२०० मेट्रीक टनाच्यावर लागणाऱ्या ऑक्सिजनबाबत इतर राज्यांमधून आणण्याचा एक कोटा ठरवून दिला आहे. त्यातील काही ऑक्सिजन प्लॉन्ट हे जवळ आहेत, काही शेकडो किलोमीटर तर काही हजारो किलोमीटरवर आहेत. पण तरी देखील आपण बाहेरून मिळणाऱ्या ऑक्सिजनचेही पैसे देतो आणि ऑक्सिजन वाहतुकीचसाठी देखील पैसे वेळेवर देऊन, आपल्या राज्यात वेळेवर ऑक्सिजन पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र रूग्ण वाढ अधिक झाली तर मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. सुदैवाने रूग्ण संख्या ही स्थिरावलेली आहे. ऑक्सिजन आपण अगदी काठोकाठ पुरवत आहोत.” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

रेमडेसिविरचा अनावश्यक वापर टाळा – मुख्यमंत्र्यांचं आवाहन

तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ”आता अचनाक रेमडेसिविरची मागणी फार मोठ्याप्रमाणावर सुरू झाली आहे. आपल्याला रोजची सरासरी ५० हजार इंजेक्शनची आवश्यकता आहे. आपण आज किती मिळवत आहोत, तर ऑक्सिजन प्रमाणेच रेमडेसिविरचं वितरण हे केंद्राने आपल्या हातात घेतलेलं आहे. कारण, परिस्थती फारच वाईट आहे. प्रत्येक राज्याला ऑक्सिजन पाहिजे, इंजेक्शन हवेत, व्हेंटिलेटर्स हवे आहेत. आपल्याला साधरणपणे सुरूवातीस केंद्राने दर दिवशी २६ हजार ७०० च्या आसपास हे इंजेक्शन मिळतील अशी व्यवस्था केली होती. आपली मागणी ५० हजारांची आहे. त्यानंतर मी पंतप्रधानांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. यानंतर ४३ हजार दर दिवशी अशी आपल्यासाठी सोय करण्यात आली. आज साधरणपणे ३५ हजारांच्या आसपास ही रोजची इंजेक्शन आपल्याला मिळत आहेत. त्याचे देखील आपण पैसे देऊन हे इंजेक्शन घेतो आहोत. मात्र ही इंजेक्शन पुरवत असताना, एक गोष्ट मी राज्यातील सर्व कोविड केअर सेंटर व रूग्णालायांमधील कार्यरत डॉक्टर्स आहेत. त्यांना मी सांगतोय, याचबरोबर रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सांगतो आहे की, नीट लक्षात घ्या डब्यूएचओ व आपल्या टास्क फोर्स, केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी देखील एक सावधानतेचा इशारा दिलेला आहे. तो म्हणजे रेमडेसिविरचा अनावश्यक,अनाठायी वापर करू नका.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oxygen shortage f patient growth is high there is a possibility of a big problem cm msr
First published on: 30-04-2021 at 22:32 IST