अतिवृष्टीमुळे २८ हजार हेक्टरवर नुकसान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हर्षद कशाळकर, लोकसत्ता

रायगड: निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदा रायगडच्या शेतकऱ्यांना मोठय़ा  प्रमाणात बसला. यंदा भाताचे पीक उत्तम आले असतानाच पावसामुळे मोठे नुकसान झाले. सरासरीपेक्षा कमी उत्पादन झाल्याचे कृषी विभागाच्या चाचण्यांमधून समोर आले आहे.

रायगड जिल्ह्य़ांत १ लाख २४ हजार हेक्टर इतके खरिपाच्या लागवडीचे क्षेत्र आहे. यापैकी ९९ हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा भात पिकाची लागवड करण्यात आली होती. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे पीकही जोमात आले होते. त्यामुळे चांगल्या उत्पादनाची अपेक्षा शेतकऱ्यांनी बाळगली होती. मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्य़ातील २८ हजार ६८१ हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले.  कृषी विभागातर्फे उत्पादकता मोजली जाते. त्यासाठी पीक कापणी प्रयोग केले जातात. ज्यांनी सुरुवातीला कापणी केली त्यांना हेक्टरी साधारण ३५ ते ४० क्विंटल भाताचे उत्पादन मिळाले. मात्र नंतर झालेल्या अवकाळी पावसाने पुरती दैना उडाली. निमगरवा आणि हळवा या भात पिकाला मोठा फटका बसला. त्यांना हेक्टरी केवळ २० क्विंटल इतकेच भाताचे उत्पादन मिळाले. रायगड जिल्ह्य़ात भाताची उत्पादकता सरासरी २६ क्विंटल इतकी आहे

हवामानाच्या लहरीपणाचा जिल्ह्य़ातील शेती उत्पादनावार विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीही भाताची उत्पादकता हेक्टरी १९ क्विंटल एवढीच होती. शेती आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढत चालल्या आहेत.

दर अधिक तरीही..

मागील वर्षी सर्वसाधारण भाताला १ हजार ८५० रूपये प्रतिक्विंटल असा दर आणि ७०० रूपये बोनस देण्यात आला तर ए ग्रेडच्या भाताला १ हजार ८६५ रूपये प्रतिक्विंटल दर व ७०० रूपये बोनस मिळाला यंदा सर्वसाधारण भाताला १ हजार ८६८ रूपये प्रतिक्विंटल तर ए ग्रेडसाठी १ हजार ८८८ रूपये प्रतिक्विंटल दर आणि दोन्हीला ७०० रूपये बोनस जाहीर करण्यात आला आहे . मागील वर्षीच्या तुलनेत हा दर अधिक असला तरी यंदा अवकाळीने शतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .

खरेदीची सद्यस्थिती

यंदा जिल्ह्य़ात ३५ हमीभाव भातखरेदी केंद्रांना शासनाने मंजुरी दिली आहे .त्यापैकी ३१ केंद्र सुरू करण्यात आली आहेत . तर १८ केंद्रांवर खरेदी सुरू झाली आहे .

रायगडच्या दक्षिण भागात  भाताची खरेदी उशिराच सुरू होते .त्यातच यंदा अवकाळी पावसाने भाताचे दाणे भिजल्याने भात केंद्रांवर येण्यास उशीर होत आहे. परंतु लवकरच सर्व केंद्र सक्रीय करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 – केशव ताटे, जिल्हा पणन अधिकारी

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paddy crop in 28000 hectares damage due to heavy rains in raigad zws
First published on: 13-01-2021 at 03:52 IST