कराड: हिंदुस्तानात पाकिस्तान समाविष्ट करून पाकिस्तानचे नाव जगाच्या नकाशावरून पुसावे. राज्यकर्त्यांना हे जमत नसेल तर, आम्ही लढायला तयार आहोत. आपले सैन्यदलही मजबूत आहे; एकदाचे काय व्हायचे ते होऊन जाऊ द्या, अशी आक्रमक भूमिका माजी मंत्री बच्चू कडू यांनी मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ५६ इंचाच्या छातीची व्याप्ती वाढवण्याची ही वेळ असल्याचा टोला त्यांनी लगावला.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी आलेले बच्चू कडू पत्रकारांशी बोलत होते. ‘प्रहार जनशक्ती’चे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.मोदी म्हणायचे पाक भारताचे आहे. मग अमेरिकेत जाऊन काय मुजरे घालता. मोदीच स्वतः फसले, मुजरा करायला लागलेत, अशी टीका कडू यांनी केली.

इंदिरा गांधींनी ठरावीक लोकांच्या ताब्यात असलेल्या बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. तर मोदींनी त्यांचे खासगीकरण केले. मागच्या वेळेस त्यांनी शंभर उद्योगपतींना तब्बल दहा लाख कोटींची कर्जमाफी दिली. या रकमेत देशाचा अर्थसंकल्प दोनदा मांडावा लागेल. याउलट संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना मात्र, केवळ दहा हजार कोटींची कर्जमाफी दिली. मोठ्या कंपन्यांसह बँकांचे खासगीकरण केले. बँकांत लोकांच्या कष्टाची पै- पै जमा असते. परंतु, त्याचे खासगीकरण करण्याचे मोठे पाप मोदींनी केले.

पैसा श्रीमंतांकडून गरिबांकडे जाण्याचे बँक हे मोठे साधन होते, ते तोडण्याचे काम मोदी सरकारने केले असल्याची टीका कडू यांनी केली.राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात ते म्हणाले, लाडक्या बहिणींचा निवडणुकीपुरता फायदा करून घेतला गेला. मतयंत्र (ईव्हीएम) घोटाळा करून त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी ही योजना दाखवण्यात आली. निकाल लागल्यावर त्याचे श्रेय लाडकी बहीण योजनेवर केंद्रित करण्याचे काम केल्याने ही योजना केवळ एक बुजगावणे आहे. तसेच दिव्यांगांना चार- सहा महिने पगार, मानधन मिळत नाही. मग मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच आमदारांचे वेतन थांबले का? असा संतप्त सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला.

काश्मिरात अतिरेक्यांनी २८ लोकांना मारले. त्याठिकाणी आपले सुरक्षारक्षक नव्हते, ही चूक संरक्षणमंत्री अमित शहांनी कबूल केली आहे. मात्र, याची तातडीची ठळक बातमी (ब्रेकिंग न्यूज) कोणत्या माध्यमांवर दाखवण्यात आली? हे माध्यमांनी सांगावे. अर्ध्यापेक्षा जास्त दूरचित्रवाहिन्या उद्योगपतींच्या हातात चालल्यात. याचे परिणाम आपण बघतोय. बातमी जाती- धर्माची होते, यावरून माध्यमांची महत्त्वाची भूमिका आता संपल्याचे दिसून येते. तसेच राजकारण्यांनी देश कुठे न्यायचा आणि निवडणूक कशी सोपी करायची, याचा निर्णय घेतला असल्याची टीका त्यांनी केली.