अनेकविध कारणाने सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी लता सानप यांना बोईसर पालघर रोड येथील एका गृहसंकुलातील सदनिकेमध्ये २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक झाली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप व पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.

एका शिक्षकाच्या बदली प्रस्ताव प्रकरणी लता सानप यांनी लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदार शिक्षकाला लाच द्यायची नसल्याने त्यांनी तशी रीतसर तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाकडे केली. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास पथकाने पालघर बोईसर रस्ता स्थित एका गृह संकुलामधील सदनिकेच्या जवळपास सापळा रचला. तसेच तक्रारदार शिक्षकाकडून २५ हजाराची लाच घेताना लता सानप यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका अधिकाऱ्याने या कारवाईला दुजोरा दिला. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया व चौकशी सुरू करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लता सानप या गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात राहिल्या आहेत. जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेत त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव घेतला होता. जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेणे, शिक्षक व संबंधितांना भेटी न देणे, कर्मचाऱ्याशी उद्धट व उर्मट वागणे, मनमानी कारभार तसेच अनेक प्रकरणात लाच मागणे असे आरोप त्यांच्यावर झालेत. त्यामुळे एकूणच प्राथमिक शिक्षण विभाग त्यांच्या कार्यप्रणालीबाबत नाराज होता.