आर्यन खान प्रकरणात एनसीबीचा साक्षीदार असलेल्या किरण गोसावीला पालघर पोलिसांनी अटक केली आहे. फसवणुकीच्या प्रकरणात गोसावीला अटक करण्यात आली असून त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. यापूर्वी गोसावीला एका फसवणुकीच्याच प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केली होती. गेल्या महिन्यात त्याला पुण्यातील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

किरण गोसावी ११ नोव्हेंबरपासून लष्कर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत होता. त्यापूर्वी त्याला फरासखाना पोलिस ठाण्यात अशाच एका प्रकरणात अटक करून १२ दिवस कोठडीत ठेवण्यात आले होते. किरण गोसावी याच्यावर पुण्यातील फरासखाना, लष्कर, पुणे शहरातील वानवरी पोलीस ठाण्यात आणि पिंपरी चिंचवडच्या भोसरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत.

किरण गोसावी आणि त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर रोहोजी साईल हे अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आलेल्या ड्रग्ज प्रकरणात स्वतंत्र साक्षीदार आहेत. क्रूझवर छापा टाकल्यानंतर गोसावीने एका व्यक्तीकडून ५० लाख रुपये घेतल्याचा आरोप साईलने केला होता. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने आर्यनला अटक केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबतचा त्याचा सेल्फी व्हायरल झाल्यानंतर गोसावी प्रसिद्धीच्या झोतात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एनसीबीच्या पथकाने २ ऑक्टोबर रोजी समुद्रात गोव्याकडे निघालेल्या कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरील कथित ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात आतापर्यंत दोन नायजेरियन नागरिकांसह एकूण २० जणांना अटक करण्यात आली आहे.