सातारा : युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सह्याद्री पर्वतरांगेची नोंद केली आहे. त्यातील पाचगणी हे गाव १० दुर्मीळ वनस्पती आणि प्राण्यांचा मूळ अधिवास आहे. जे इतर कोठेही आढळत नाहीत. परंतु अलीकडच्या काळात निसर्गाचा हा ठेवा लोप पावू लागला आहे. हा वारसा, हा ठेवा आपण सर्वांनी जतन केला पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

पाचगणी गिरिस्थान पालिका आणि पुणे येथील रानवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पाचगणी येथील टेबल लॅण्ड पठारावरील ऱ्हास पावणाऱ्या दुर्मीळ वनस्पतीच्या पुनर्रोपण कार्यक्रम प्रसंगी पाटील बोलत होते. या वेळी नगररचना विभागाचे निवृत्त संचालक, महाबळेश्वर – पाचगणी इको सेन्सिटिव्ह झोनचे अध्यक्ष सुधाकर नांगनुरे, एचएलएमसी कमिटी सदस्य अंकुर पटवर्धन, नगररचना विभागाचे सहायक संचालक वी. ल. वाघमोडे, मुख्याधिकारी पंडित पाटील, महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन म्हस्के, हिलदारी संस्थेचे डॉ. मुकेश कुलकर्णी, रानवा संस्थेचे सदस्य, नगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, वनपाल रणजित काकडे, वनक्षेत्रपाल बिरू जावीर, शिपाई संजय भिलारे, महसूल कर्मचारी आदी उपस्थित होते.

ज्या वनस्पती पाचगणी पठारावर फार कमी प्रमाणात राहिल्या आहेत. ज्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आणि ज्या रेड लिस्टमध्ये समाविष्ट झाल्या आहेत, त्यांपैकी आज चार वनस्पतींची रोपे तयार करून आणली आहेत. त्यांचे पुनर्रोपण करण्यात आले. या जुन्या ठेव्याच्या पुनर्रोपणाने भविष्यात पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी, अभ्यासक यांना त्यांचा सखोल अभ्यास करण्याकरिता टेबल लँड पठार आकर्षित होणार आहे. तसेच त्याला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे.

संतोष पाटील पुढे म्हणाले, की सातारा जिल्हा हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे. वैविध्याने परिपूर्ण आहे. आणि हे नैसर्गिक वैविध्य पाहण्यासाठी वेगवेगळ्या भागांतून पर्यटक या ठिकाणी येत असतात. त्यामुळे हा नैसर्गिक वारसा आपल्याला जतन केला पाहिजे. तो वृद्धिंगत केला पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढीपर्यंत या वनस्पती आणि प्राणी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांनाही त्यांचा नैसर्गिक अधिवास मिळेल.

पाटील पुढे म्हणाले, की माणसाला जशी त्याच्या अधिवासाची गरज असते, तशी निसर्गात वनस्पती आणि प्राण्यांना त्याची गरज आहे. आपण पावसाळी पर्यटन, हिवाळी व उन्हाळी पर्यटन म्हणतो. परंतु या वनस्पतींचा आणि प्राण्यांचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, संशोधक असतील आणि इतर सर्वसामान्य पर्यटकही असतील, त्यांनाही या वनस्पती आणि प्राणी पाहण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि ही संधी द्यायची असेल, तर प्रशासन म्हणून, स्थानिक प्रशासन, स्थानिक नागरिक या सर्वांनी या परिसरामध्ये फुलणाऱ्या या वनस्पती व प्राणी जबाबदारीने जपले पाहिजेत.

या वेळी पठारावर ठिकठिकाणी रानवा संस्थेने तयार करून आणलेल्या दुर्मीळ वनस्पतींच्या रोपांचे रानवा सदस्य आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने रोपण करण्यात आले.