पंढरपूर : कार्तिकी यात्रेत शहरातील विविध भागांतून सहा आयसीयू सेंटर उभारण्यात आले होते. या सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालयातून जवळपास ३५ हजारहून अधिक भाविकांना औषधोपचार करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक धोत्रे यांनी दिली आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्तिकी यात्रा कालावधीमध्ये येणाऱ्या भाविकांना आरोग्य सेवा देण्यात आल्या होत्या.

कार्तिकी यात्रा २६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये पंढरपूर येथे विविध ठिकाणी आरोग्य सुविधा देण्यात आल्या होत्या. यामध्ये चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर, वाळवंट-२, पत्रा शेड, दर्शन मंडप या शहरांतील गर्दीच्या पाच ठिकाणी व उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे असे एकूण सहा आयसीयू सेंटर स्थापन करण्यात आले होते. आयसीयू सेंटरमध्ये १२७ गंभीर रुग्णांना उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर यशस्वी उपचार करून ‘डिस्चार्ज’ देण्यात आला.

तसेच विविध इतर आजारांच्या ४२८ रुग्णांना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. वाळवंट व नदी पात्रात तैनात असलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने नदीत बुडालेल्या कर्नाटक येथील रुद्राप्पा गोलार (वय ४५) यांना नदीतून बाहेर काढून बेशुद्ध अवस्थेत उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे पाठवण्यात आले. त्यांच्यावर योग्य उपचार सुरू केले व रुग्णास जीवदान दिले.

तसेच ६५ एकर येथील आयसीयूमध्ये विश्वंभर कारपुरे (वय ६०, रा. भूम) या भाविकास हृदयविकाराचे निदान करण्यात आले व तातडीने आवश्यक उपचार करून शासनाच्या ‘स्टेमी प्रोजेक्ट’ अंतर्गत येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले. तसेच स्टेमी प्रोजेक्टअंतर्गत हृदयविकाराच्या इतर सात रुग्णांवरती या रुग्णालयात मोफत उपचार चालू आहेत.

राज्याचे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, पुणे विभागाचे संचालक डॉ. विजय कंदेवाड, पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवा देण्यात आली.

यात्रा कालावधीत १ हजार ७८४ हून अधिक रुग्णांच्या रक्त, लघवी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. ४१९ रुग्णांचे एक्स रे, २५६ रुग्णांचे सी.टी स्कॅन करण्यात आले. तर २१४ रुग्णांचे ईसीजी करण्यात आले तसेच चार सर्पदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. प्रसन्न भातलवंडे यांनी दिली.