महाराज मंडळींच्या मागणीपुढे सरकार झुकणार का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये सहअध्यक्ष नेमण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने या पदासाठी लगेचच अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. वारकरी संप्रदायातील मंडळीना मंदिर समितीमध्ये स्थान द्यावे या मागणीसाठी महाराज मंडळींनी आषाढी यात्रेपासून आंदोलन सुरू केले होते. मात्र महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करून काíतकी यात्रेपर्यंत तोडगा काढू, असे आश्वासन दिले. त्या अनुषंगाने मंदिर समितीच्या सहअध्यक्षपदी आता कोणाची वर्णी लागणार, महाराज मंडळीच्या मागणीपुढे सरकार झुकणार का, याकडे पंढरपूरवासीयांचे लक्ष लागले आहे.

दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले आणि वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. या मंदिर समितीचे गठन जूनपूर्वी करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्र देऊन मंदिर समितीच्या अध्यक्षपदी कराडचे डॉ. अतुल भोसले यांची निवड केली, तर मंदिर समितीच्या सदस्यपदी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि भास्कर गिरी महाराज या महाराज  मंडळींची निवड केली. तर इतर सदस्यपदी स्थानिक तसेच मर्जीतल्या माणसांची निवड करून सरकारने एकदाची समिती गठित करून जबाबदारी पार पाडल्याचे समाधान मिळवले. मात्र ऐन आषाढी यात्रेत म्हणजेच आषाढी दशमीला एकीकडे सर्व संतांच्या पालख्यांचे पंढरपुरात आगमन होत होते, तर दुसरीकडे एकादशीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री पंढरीत दाखल झाले. त्याच वेळी महाराज मंडळीनी आंदोलन करीत मंदिर समिती बरखास्त करा तरच सर्व पालख्या पंढरीत जातील असा इशारा दिला. तातडीने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी महाराज मंडळींशी बातचीत करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन दिले आणि समितीच्या निवडीची ठिणगी पेटली.

त्यानंतर महाराज मंडळी आणि राज्य सरकार यांच्या बरोबर चर्चा झाली. पण त्यातून काही तोडगा निघाला नाही. मग महाराज मंडळीनी आंदोलन, ठिय्या आंदोलन असे सुरू केले. पुढे जाऊन मुंबई येथे आझाद मदानावर आमरण उपोषणाची तयारी केली. या वेळी राज्य सरकारकडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिष्टाई केली. महाराज मंडळींशी पुण्यात चर्चा, बठक घेऊन काíतकी यात्रेपर्यंत तोडगा काढू असे आश्वासन दिले. जर तोडगा निघाला नाही तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा महाराजांनी दिला. त्यानंतर नुकतेच राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बठकीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर सहअध्यक्ष हे नवीन पद निर्माण करण्याचा निर्णय घेतला. पंढरपूर मंदिरे अधिनियम १९७३ मधील कलम २१ (१) क मध्ये सुधारणा करण्यासह २१ (१) ग अशी नवी तरतूद केली. त्यामुळे एकाअर्थाने कायदेशीर समितीमध्ये कायदेशीर बाबी पूर्ण केली जात आहे. पुढील सारे सोपस्कार होण्यास वेळ लागणार आहे. या साऱ्या प्रकारात महाराज मंडळी काय भूमिका घेणार हेही पाहावे लागणार आहे. मात्र या पदावर आपली वर्णी लागावी म्हणून आता महाराज मंडळी कामाला लागले आहेत. या पदासाठी इच्छुकांमध्ये ह.भ.प. रामेश्वर शास्त्री, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांची नावे आघाडीवर आहेत.

मंदिर समितीच्या अध्यक्षपदी डॉ. अतुल भोसले यांनी पदभार घेतल्यावर नित्योपचार समिती नेमली. या समितीचे अध्यक्षपद समिती सदस्य ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांना दिले. यामुळे अध्यक्ष डॉ. भोसले यांनी महाराज मंडळींच्या आंदोलनाची सुरुवातीलाच हवा काढली. मंदिराचे म्हणजे देवाचे नित्य विधी, उपचार, पोशाख आदी बाबत निर्णय घेण्याचे अधिकार औसेकर महाराज यांना समितीच्या अध्यक्षांनी दिले. त्यामुळे गेले चार महिने याबाबत कोणताही वाद झाला नाही. हा अनुभव पाहता औसेकर महाराज यांचे नाव देखील चच्रेत आहे. काíतकी एकादशीची शासकीय महापूजा महसूलमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने समितीच्या सहअध्यक्ष पदाबाबत महाराज मंडळींशी चर्चा होणार आहे. सर्व महाराजांनी चर्चा करून एक नाव या पदासाठी सरकारला सुचवावे अशी एक शक्यता आहे. यामध्ये सरकारने महाराज मंडळींना मान दिला. वारकरी संप्रदायातील मंडळींनाच तुमचा प्रतिनिधी नेमण्याचा अधिकार दिला असे सरकार सुचवणार आहे. तर दुसरीकडे या पदासाठी कोणाचे नाव कुणी सुचवायचे आणि सुचवलेल्या नावावर एकमत होणार का अशी भीती महाराज मंडळीना आहे.

एकंदरीत सुरुवातील मंदिर समिती गठित व्हावी. त्यानंतर समितीमध्ये कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता होती. आषाढी यात्रेला समिती जाहीर झाली आणि समितीबाबत नाराजी जाहीर करीत महाराज मंडळींनी आंदोलन केले. सरकारने आंदोलन मागे घ्यावे म्हणून मंदिर समितीला सहअध्यक्ष पद नेमण्यास मंजुरी दिली. आता पुन्हा कोणाची वर्णी लागणार? महाराज मंडळींच्या आंदोलनापुढे सरकार झुकले का? सरकार आता हे पद कधी भरणार यासारख्या प्रश्नांवर कसा आणि कधी तोडगा निघणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सहअध्यक्ष नेमण्याचा निर्णय अभिनंदनीय  -डॉ. भोसले

मंदिर समितीला नव्याने सहअध्यक्ष पद निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. सदरचा निर्णय हा अभिनंदनीय आहे. सरकारने सर्व घटकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. यामुळे मंदिर प्रशासनात काम करण्यास सुलभता येईल. पर्यायाने श्री विठल मंदिर आणि पंढरपूरचा विकास होण्यास मदतच होईल. त्यामुळे सहअध्यक्षपदाचे आपण स्वागत करीत असल्याचे श्री विठठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandharpur vitthal temple committee
First published on: 01-11-2017 at 03:26 IST