बीड : गेल्या काही दिवसांपासून वैद्यनाथ साखर कारखान्याच्या विक्रीबाबत प्रकाशित होणाऱ्या आरोपांचे खंडन करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी हा कारखाना देताना वेदना झाल्याची कबुली सोमवारी दिली. हा कारखाना ओंकार साखर कारखाना या खासगी कंपनीने चालविण्यास घेतला आहे. कारखान्याच्या बॉयलर प्रदीपन व मोळी टाकण्याच्या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.
ओंकार साखर कारखाना प्रा. लि. युनिट नं. ८चा (पूर्वीचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना) बॉयलर प्रदीपन सोहळा आणि मोळी टाकण्याचा समारंभ आज पार पडला. मंत्री पंकजा मुंडेंनी या वेळी बोलताना, ‘वैद्यनाथ’पेक्षाही ओंकारची व्याप्ती मोठी आहे. ओंकार साखर कारखाना म्हणताना माझ्या मनात जराही चलबिचल होत नाही. बाबूराव बोत्रे पाटील यांच्यामुळे वैद्यनाथाचे ओंकार रूप होणे शक्य झाले. ओंकार ग्रुपला वैद्यनाथ कारखाना चालवायला दिला याबद्दल माझ्या मनामध्ये समाधान असून, राज्यातील सगळ्या कारखान्यांपेक्षा बोत्रे पाटील चांगले काम करतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
सहवीज प्रकल्पासाठी गोपीनाथ मुंडे यांच्या काळात घेतलेले कर्ज, व्याज अधिक होते. त्यामुळे कारखान्याचे नुकसान वाढत गेले. राजकीय परिस्थितीमुळे राज्य बँकेचे कर्ज मिळू शकले नाही. त्यानंतर कारखान्यामध्ये दुर्दैवी अपघात झाला. नंतर कोरोनामुळे गोदामातली साखर विकली जाऊ शकली नाही. ज्या दिवशी साखर विकली त्या दिवशी अकरा कोटी रुपये बँकेने जप्त केले. मी गोपीनाथ मुंडे यांची लेक आहे. स्वतःचे मौलवान डाग गहाण टाकून या कारखान्यासाठी पैसे उपलब्ध केले आहेत. कारखान्याला कर्मचारीस्तरावर चांगले नेतृत्व मिळाले नाही. मी मंत्री झाल्यावर कारखान्यासाठी सरकारकडे कमी व्याजदराने पैसे देण्याची विनंती केली. सरकारने ११ कारखान्यांना पैसे दिले; मात्र माझ्या कारखान्याला दिले नाहीत. त्यानंतर बँकांनी जप्ती कारवाई केली. बँकेने किंमत ठरवून कारखान्याचा लिलावही केला.
बँका थांबायला तयार नसल्याने बँकेला सहकार्य करायचे ठरवले. त्यानंतर बोत्रे पाटलांना कारखाना दिला. कारखान्यात बदल केले आहेत कारखाना दुप्पट क्षमतेने चालणार आहे. जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्यापेक्षा कारखाना जास्त दर देणार आहे. ओंकारच्या रूपाने कारखान्याचा पुनर्जन्म झाला असून, त्याला आशीर्वाद द्या, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. यंदा कारखान्याचे उद्दिष्ट दहा लाख टन असल्याचेही पंकजा मुंडेंनी सांगितले.
आमचे १७ कारखाने – बोत्रे पाटील
देशामध्ये सर्वांत जास्त ऊस गाळप करणारा ओंकार समूह आहे. आम्ही महाराष्ट्रात १५ आणि कर्नाटकात २ असे एकूण १७ युनिट चालवतो. दिवंगत गोपीनाथ मुंडेंसारख्या नेत्याने कष्टाने कारखाने उभे केले. ते कारखाने बंद न पडता, पुढे सुरू राहावेत हा यामागचा उद्देश आहे. या भागातील साखर कारखाने चालवणे, शेतकऱ्याला उसाचे पैसे देणे, शेतकऱ्याला दिवाळीला मोफत साखर देणे, कर्मचाऱ्याला दर महिन्याला पगार देणे, ज्या बँकांनी आम्हाला मदत केली, त्यांना दर महिन्यांना व्याज देणे, ऊसतोडणी आणि वाहतूकदारांचे वेळेवर पैसे देणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे पाटील म्हणाले.
