एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यामध्ये वर्णी लागलेल्या मंत्र्यांची नावं यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. विशेषत: आधीच्या सरकारच्या कालावधीमध्ये पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यामुळे राजीनामा द्यावा लागलेल्या संजय राठोड यांच्या समावेशावरून टीका केली जात आहे. मात्र, राठोड यांच्यासोबतच या विस्तारामध्ये एकाही महिला आमदाराला संधी मिळाली नसल्याची देखील टीका केली जात आहे. या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये बीडच्या नेत्या पंकजा मुंडे यांना संधी न मिळाल्याबद्दल चर्चा सुरु असतानाच याबद्दल पंकजा यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करणारी प्रतिक्रियाही दिली असताना आज पुन्हा एकदा त्यांना या विषयावरुन विचारण्यात आलं असता त्यांनी हसत हसत या प्रश्नाला उत्तर दिलं. त्याचं उत्तर ऐकून तेथे उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबरच पत्रकारांनाही हसू अनावर झालं.

नक्की वाचा >> “शिंदे आणि फडणवीस सरकारच्या स्थापनेत…”; ‘खोटं श्रेय घेणार नाही’ म्हणत पंकजा मुंडेंचं मोठं विधान

परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅली कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना, “मंत्रीमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा येतोय आता. त्यामध्ये तुम्हालाही हायकमांडकडून फोन सुरु झाले आहेत, अशी माहिती येत आहे समोर. काही फोन वगैरे आलेला का?” असा प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकून पंकजा यांनी हसतच, “तुम्हाला जी माहिती दिली जाते ती कोण देतं ते सांगा. मी त्याला पकडते,” असं उत्तर दिलं.

“येत्या मंत्रीमंडळ विस्तारात बीडकरांना स्थान मिळणार आहे का?” असा प्रश्नही यावेळी पंकजा यांना विचारण्यात आला. “या विषयावर प्रदेशाध्यक्ष प्रकाश टाकतील. जे निर्णय घेणार आहेत, यादी बनवणार आहेत तेच सांगू शकतील. मी त्या यंत्रणेत नाही. त्यामुळे मी सांगू शकत नाही. या वंचित भागाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणजे त्यांना न्याय मिळेल असं मला वाटतं,” असं उत्तर पंकजा यांनी दिलं.

“कुठेतरी बीडचं राजकीय वजन कमी पडतंय अशी चर्चा होतेय राज्यात,” असं म्हणत पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर पंकजा यांनी, “म्हणून मी माझं (वजन) वाढवलंय सध्या” असं उत्तर दिलं आणि त्या तिथून निघून गेल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वीच रक्षाबंधनाच्या दिवशी महादेव जानकर यांना राखी बांधल्यानंतर पंकजा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतानाही मंत्रीपदासंदर्भात भाष्य केलेलं. पंकजा यांनी, ““मला मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल. अजून पात्रतेचे लोक असतील कदाचित. त्यांना जेव्हा माझी तेवढी पात्रता वाटेल तेव्हा देतील. त्याबद्दल मला काही आक्षेप नाही. चर्चा माध्यमे किंवा कार्यकर्त्यांकडून होतात. आता माझे कार्यकर्ते आणि मी देखील शांत बसले आहे. त्यांना ज्यांची पात्रता आहे असं वाटेल, त्यांना ते मंत्रीपद देतील. त्यात माझी काही भूमिका असण्याचं कारण नाही. मी स्वाभिमानाने राजकारण करण्याचा प्रयत्न करते”, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केलेल्या.