Pankaja Munde On Resignation Of Dhananjay Munde: राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष हत्या प्रकरण तापलेले आहे. अशात आज कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचे या प्रकरणात आरोपी म्हणून नाव आल्यानंतर विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर आज मुंडे यांनी राजीनामा दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हा राजीनामा फार आधी…

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या भगिनी आणि भाजपाच्या मंत्री पंकजा मुंडेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, “धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे. मी त्याचे स्वागत करते. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. या राजीनाम्यापेक्षा शपथच व्हायला नको होती.”

धनंजय मुंडेंची पोस्ट

दरम्यान धनंजय मुंडे यांनीही, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनाम दिल्याची माहिती एक्सवर पोस्ट करून दिली. आपल्या पोस्टमध्ये धनंजय मुंडे म्हणाले की, “बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तवसुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे सोपवलाला आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संतोष देशमुख हत्या प्रकरण

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, एक आरोपी अद्याप फरार आहे. २७ फेब्रुवारी रोजी, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने बीड जिल्हा न्यायालयात सुमारे १,२०० पानांचे आरोपपत्र सादर केले, ज्यामध्ये देशमुख यांच्या हत्येचा आणि त्यासंबंधित दोन प्रकरणांचा समावेश आहे. बीडमधील केज पोलिस ठाण्यात सरपंच देशमुख यांची हत्या, आवदा कंपनीला खंडणी मागण्याचा प्रयत्न आणि कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.