|| वसंत मुंडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजप, मित्र पक्षातील नेत्यांच्या उपस्थितीबाबत उत्सुकता :- भाजप नेत्या पंकजा मुंडे गुरुवारी गोपीनाथगडावर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नेमके काय बोलणार? आणि या कार्यक्रमाला भाजप व मित्र पक्षातील कोणते नेते उपस्थित राहणार? विधानसभेतील पराभवानंतर पंकजा यांनी काही दिवसांपूर्वी, पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? यावर १२ डिसेंबर रोजी बोलणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर राजकीय वादळ उठले. नाराज नेत्यांकडून शक्ती प्रदर्शन होणार का याबाबतचीही उत्सुकता आहे.

बीड जिल्ह्य़ातील परळी येथे गुरुवार दि. १२ डिसेंबर रोजी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे गोपीनाथगडावर येण्याचे निमंत्रण समाजमाध्यमातून पंकजा मुंडे यांनी समर्थकांना दिले आहे. या वेळी जयंतीनिमित्त वेगळा काही कार्यक्रम आयोजित केला नसला तरी राज्यभरातून मोठय़ा संख्येने मुंडे समर्थक, नेते उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने व्यासपीठ व मंडप उभारण्यात आले आहे.

पंकजा मुंडे यांनी चार वर्षांपूर्वी पंधरा एकर जागेवर गोपीनाथगडाची निर्मिती केल्यानंतर जयंती आणि स्मृतिदिनाला विविध सामाजिक उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी कार्यक्रमांना हजेरी लावल्याने गोपीनाथगड हे पंकजा मुंडेंचे राजकीय ‘शक्तीकेंद्र’च मानले जाते. लोकसभा निवडणुकीनंतर ३ जून रोजी स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह राज्यातील दहा खासदारांनी हजेरी लावून आपल्या विजयात पंकजा मुंडेंचा वाटा असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे पंकजा यांच्या नेतृत्वाचा राज्यभर प्रभाव असल्याचेच मानले गेले. बहीण डॉ. प्रीतम मुंडे यांना पावणे दोन लाखाच्या मताधिक्याने विजयी करून जिल्ह्य़ावरही आपली पकड असल्याचे दाखवले होते. असे असताना विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पंकजा यांचा राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी तीस हजाराच्या मताधिक्याने पराभव केला.

तर जिल्ह्यातील विधानसभेच्या सहापैकी केवळ दोनच जागा भाजपला राखत्या आल्या. जनतेच्या ‘मनातील मुख्यमंत्री’ म्हणून कायम चच्रेत असलेल्या पंकजा यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पाश्र्वभूमीवर काही दिवसापूर्वी पंकजा यांनी समाजमाध्यमातून प्रसारित केलेल्या मजकुरात अनेकांना हवा होता म्हणून पराभव झाला असावा. तसेच पुढे काय करायचे? कोणत्या मार्गाने जायचे? आपली शक्ती काय? आपण लोकांना काय देऊ शकतो? असे सांगत मावळ्यांनो या..  अशी साद समर्थकांना घातल्यामुळे माध्यमामधून पंकजा मुंडेंची नाराजी आणि कथित पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या.

भाजप अंतर्गत उमेदवारीने डावलले गेलेले एकनाथ खडसे, विनोद तावडे, माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह नेत्यांच्या भेटीचा सिलसिला आणि चर्चा सुरू झाल्याने राजकीय वादळ उठले. पंकजा मुंडे यांनी नाराज नसून जाणीवपूर्वक आपल्याबद्दल वावडय़ा उठवल्या जात असल्याचे स्पष्टीकरण दिले तरी त्यांच्या भूमिकेची उत्सुकता कायम राहिली.

पंकजा मंत्री असताना दरवर्षी या कार्यक्रमात शासन आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने समाजातील वेगवेगळ्या घटकांना मदत केली जात असे. या वर्षी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी मोफत आरोग्य शिबीर ठेवले आहे. कार्यक्रमाची वेगळी तयारी नसून कोण नेते येणार आहेत? याबाबतचीही माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंडे समर्थकांचे स्फूर्तिस्थान

गोपीनाथ मुंडे यांनी चाळीस वर्षांच्या राजकीय प्रवासात राज्यभरात नेते आणि समर्थकांची मोठी फळी निर्माण केली. पाच वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी वडिलांच्या स्मरणार्थ गोपीनाथगड उभारला. पंधरा एकरमध्ये गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा, समाधी, परिसरात  वृक्ष लागवड, कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी आणि माहुरची रेणुकादेवी या तिन्ही देवींचे एकत्रित मंदिरही या ठिकाणी उभारले आहे.

जयंती व स्मृतिदिनाला राज्यभरातून लोक दिंडय़ा घेऊन या ठिकाणी येतात. त्यामुळे गोपीनाथगड हा उपेक्षित वंचित घटकासाठी राजकीय व सामाजिक स्फूर्तिस्थान मानला जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankja munde bjp gopinath gad akp
First published on: 11-12-2019 at 01:21 IST