दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर इंडिया आघाडीतील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना घाबरवलं जात असल्याचा आरोप केला जातोय. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीत ही कारवाई झाल्याने आपसाठी मोठा धक्का मानला जातोय. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही संताप व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत एक्स खात्यावरून सुप्रिया सुळेंचा एक व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हीडिओमध्ये त्या म्हणाल्या, काँग्रेसची खाती गोठवणे, ईडी-सीबीआयचा गैरवापर करणे. यंत्रणा अतिशय चांगल्या आहेत. पण त्यांच्यावर अदृश्य शक्तीचा दबाव आहे, हे चुकीचं आहे.

हेही वाचा >> CM Arvind Kejriwal Arrest : दिल्ली उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण, कोर्टाने निकाल ठेवला राखून

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “इन्कमटॅक्स, सीबीआय, ईडीचे अधिकारी चांगले आहेत. ते त्यांचं काम करत आहेत. पण त्यांच्यावर अदृष्य शक्ती इतका दबाव टाकतेय की अधिकारी तरी काय करतील? पापी पेट का सवाल आहे. विरोधी पक्षांनी त्यांच्याविरोधात बोलायचंच नाही. बोललं तर जेल नाहीतर प्रवेश. तिसरा मार्ग या देशात राहिलेला नाही. दुर्देव आहे की भारतात संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान सातत्याने सत्तेतील लोक करत आहेत.”

कोर्टाने निर्णय ठेवला राखून

सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दिल्लीतील मद्य गैरव्यवहारप्रकरणी गुरुवारी रात्री आम आदमी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. लोकसभा निडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्रीपदावर असताना अटक करण्यात आलेले केजरीवाल हे पहिलेच नेते आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अटकेपासून संरक्षण देण्याची केजरीवाल यांची याचिका दिल्ली उच्च न्यायायलायने फेटाळून लावल्यानंतर गुरुवारी ईडीच्या पथकाने केजरीवाल यांच्या निवासस्थानाची झडती घेतली आणि रात्री त्यांना अटक केली. त्यांना आज शुक्रवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. ईडीने यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे. याप्रकरणी कोर्टात सुनावणी पूर्ण झाली असून निर्णय राखून ठेवला आहे.