जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत चुरशीच्या वातावरणात मतदान पार पडले. मतदान टक्केवारी सरासरी ६८ टक्के असून, सायंकाळी पाचपर्यंत जिल्ह्यात ६१.५७ टक्के मतदान झाले. ज्येष्ठांसह अनेक नव्या चेहऱ्यांचे राजकीय भवितव्य मतयंत्रात बंद झाले. पाथरी येथे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्रीत हस्तक्षेप करताना एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. काही किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यात इतरत्र कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठय़ा प्रमाणात उत्साह जाणवत होता. प्रशासनाने मतदार जागृतीसंदर्भात ज्या मोहिमा हाती घेतल्या, त्याची चांगली फलश्रुती पाहावयास मिळाली. गंगाखेड, जिंतूर मतदारसंघामध्ये सुरुवातीला मतदानाची टक्केवारी अधिक होती. दोन्ही मतदारसंघांत चुरशीच्या लढती असल्याने उमेदवारांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. संध्याकाळी पाचपर्यंत जिंतूर मतदारसंघ (६१.४७), परभणी (६०.४३), गंगाखेड (६२.२३), पाथरी (६१.९३) अशी मतदानाची टक्केवारी होती. शेवटच्या तासातही लक्षणीय मतदान झाले. सुरुवातीला दुपारी १२ पर्यंत ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात मतदान झाल्यानंतर दुपारच्या वेळेस मतदानाचा वेग मंदावला होता. शेतीची कामे, कापूस, सोयाबीनसारख्या पिकांमध्ये व्यग्र शेतकरी यामुळे ग्रामीण भागात सकाळच्याच टप्प्यात मोठय़ा प्रमाणात मतदान झाले. मतदान करवून घेण्यासाठी संबंधित उमेदवारांनी कार्यकर्त्यांची जोरदार ‘फिल्डिंग’ लावली होती.
पाथरीत काँग्रेस-राष्ट्रवादीत राडा
पाथरी येथे मतदानाची वेळ संपता संपता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. एकमेकांशी हुज्जत घालत असताना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या वेळी हस्तक्षेप करीत असताना उमेश बारहाते हे पोलीस कर्मचारी जखमी झाले. देवनांद्रा माध्यमिक शाळेच्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. या घटनेच्या अनुषंगाने सायंकाळी उलटसुलट चर्चा सुरू होती. पाथरीत मोठा बंदोबस्त तैनात होता. जिंतूर मतदारसंघातील बोर्डी येथेही राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याच्या वाहनावर दगडफेक करण्याचा प्रकार घडला.
सात ठिकाणी यंत्र बदलले
जिल्ह्यात ७ ठिकाणी मतदान यंत्रात आलेल्या बिघाडामुळे यंत्र बदलावे लागले. जिंतूर तालुक्यातील िपप्री खुर्द, परभणीजवळी िपगळी, सेलूत एका ठिकाणी, गंगाखेडमध्ये दोन व पाथरीत एका केंद्रावरील मतदान यंत्र किरकोळ कारणामुळे बदलण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी दिली. जिल्ह्यात आचारसंहिता भंगचे १०७ गुन्हे दाखल झाले. जिंतूरमध्ये १७, परभणीत २३, गंगाखेड ४०, पाथरीत २७ गुन्ह्यांची नोंद आहे.
परभणीत बाजारपेठ बंद
मतदानाचा हक्क कामगारांनाही बजावता यावा, या साठी सरकारने सर्वच आस्थापना, हॉटेल, दुकाने अशांमधील कामगारांना सुटी देण्याचे आदेश बजावले होते. परंतु परभणीत बाजारपेठ सुरू असल्याने दुपारी पोलिसांनी बाजारपेठ बंद केली. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह वसमत रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. माजी मंत्री सुरेश वरपुडकर, रामप्रसाद बोर्डीकर या ज्येष्ठांसह विजय भांबळे, सीताराम घनदाट, मीराताई रेंगे, बाबाजानी दुर्राणी, डॉ. मधुसूदन केंद्रे, डॉ. राहुल पाटील, आनंद भरोसे, महापौर प्रताप देशमुख, डॉ. शिवाजी दळणर आदी नेत्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. चारही मतदारसंघात निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याने निकालाबाबतही कमालीची उत्सुकता आहे. त्या त्या मतदारसंघात मतदानादरम्यान वेगवेगळ्या अफवाही पसरत राहिल्या. काही उमेदवारांनी आपल्याला मदत होईल, या पद्धतीने या अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातल्या चारही मतदारसंघात अशी कुठली ना कुठली चर्चा दिवसभर सुरू राहिली.
संग्रहित लेख, दिनांक 16th Oct 2014 रोजी प्रकाशित
पाथरीत काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची धुमश्चक्री, पोलीस जखमी
नव्या चेहऱ्यांचे राजकीय भवितव्य मतयंत्रात बंद झाले. पाथरी येथे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्रीत एक पोलीस जखमी झाला.

First published on: 16-10-2014 at 01:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parbhani 68 voting