परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ५३ व्या संयुक्त कृषि संशोधन विकास समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीचे उद्घाटन गुरुवारी (दि.२९) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते होणार आहे. या तीन दिवशीय बैठकीत चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसह तीनशे ते चारशे कृषि शास्त्रज्ञांचा सहभाग राहणार असून ३६ नवीन वाणासह साधारणतः २४७ तंत्रज्ञान शिफारसी मांडल्या जाणार आहेत.
मुख्यमंत्र्यांसह या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती माणिकराव कोकाटे राहणार असून कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे स्वागताध्यक्ष आहेत.राज्याचे प्रधान सचिव (कृषि) विकासचंद्र रस्तोगी, कृषि परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषि आयुक्त सुरज मांढरे, राहुरीचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, दापोलीचे कुलगुरू संजय भावे हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत.
हवामान बदल, दुष्काळ, जमिनीच्या सुपीकतेचा ऱ्हास व वाढती लोकसंख्या अशा अनेक आव्हानांमुळे राज्यातील कृषी उत्पादनावर मर्यादा येत असताना राज्यातील चारही कृषि विद्यापीठांनी संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शाश्वतता निर्माण करण्यासाठी विविध पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणाऱ्या ३६ नवीन वाणांसह साधारणतः २४७ तांत्रिक शिफारसी या बैठकीत मांडण्यात येणार आहेत. या शिफारसींमध्ये सुधारित व संकरीत वाण, पशुधनाच्या सुधारीत प्रजाती, आधुनिक पीक लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक अन्नद्रव्य व कीड-रोग व्यवस्थापन, तसेच मृद व जलसंधारणासंबंधी उपाययोजना यांचा समावेश आहे अशी माहिती आज सोमवारी (दि.२६) एका पत्रकार बैठकीत देण्यात आली. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश आहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर आदी उपस्थित होते.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांमार्फत संशोधनावर आधारीत एकुण ५८ शिफारशी बैठकीत सादर करण्यात येणार असुन यात चार प्रसारीत वाण, एक कृषि औजारे यासह इतर ५३ तंत्रज्ञान शिफारशी प्रसारणासाठी मांडण्यात येणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठामार्फत संशोधनावर आधारित एकुण १०३ शिफारशी सादर करण्यात येणार असून यात १० प्रसारित वाण, १२ कृषि अवजारांसह इतर ८१ तंत्रज्ञान शिफारशी प्रसारणासाठी मांडण्यात येणार आहेत.
महात्मा फुले कृषि विद्यापीठामार्फत संशोधनावर आधारित एकुण ९४ शिफारशी सादर करण्यात येणार असून यात ९ प्रसारित वाण, ११ पूर्वप्रसारीत वाण, ३ कृषि अवजारे, १ जैविक ताण सहन करणारे स्त्रोतसह इतर ७० तंत्रज्ञान शिफारशी प्रसारणासाठी मांडण्यात येणार आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठामार्फत संशोधनावर आधारित एकुण ५० शिफारशी सादर करण्यात येणार असून यात २ प्रसारित वाण, ५ कृषि अवजारांसह ४३ सुधारीत तंत्रज्ञान शिफारशी प्रसारणासाठी मांडण्यात येणार आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीच्या तांत्रिक चर्चासत्रात चारही कृषि विद्यापीठातील ३०० हून अधिक कृषि शास्त्रज्ञ सहभाग नोंदविणार असुन वरील सर्व शिफारशींवर विचारमंथन होऊन शेतकऱ्यासाठी प्रसारीत करण्यासाठी त्यास अंतिम मान्यता देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
विकसित कृषि संकल्प अभियानचे उद्घाटन
केंद्र सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने दि. २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान देशभरात विकसित कृषि संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा आरंभ दिनांक २९ मे २०२५ रोजी होणार आहे. या अभियानामध्ये देशातील ७२३ जिल्ह्यांमधील ६५,००० पेक्षा जास्त गावांना भेट देणाऱ्या २,१७० तज्ज्ञ पथकांचा सहभाग असणार आहे. महाराष्ट्रात या अभियानाचे उद्घाटन याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.