परभणी : तालुक्यातील धारणगाव येथील एका तरुण शेतकऱ्याचा ई-पीक पाहण्यासाठी शेतात जात असताना नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ८) पहाटे उघडकीस आली. नातेवाईक व उपस्थितांनी गजानन डुकरेचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणून याविषयी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. या वेळी मृत गजानन डुकरेच्या परिवारास तत्काळ आर्थिक मदत द्यावी आणि समसापूर येथील बंधारा तत्काळ हटविण्याची मागणी नातेवाईक व धारणगाव येथील नागरिकांनी केली आहे.
गजानन आश्रुबा डुकरे (वय २२) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. गजानन रविवारी सकाळी साडेदहा-अकरा वाजण्याच्या सुमारास ई-पीक पाहणीसाठी शेतात जायला निघाला. नदीतून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने गजाननाचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि नागरिकांनी जिल्हा प्रशासनास याबाबत माहिती दिली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जीवरक्षक पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत गजानन डुकरेचा शोध घेतला. मात्र, तो न सापडल्याने पथक परत आले. दरम्यान, नातेवाईक, नागरिक रात्रभर नदी परिसरात गजाननचा शोध घेत होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास समसापूर येथील बंधाऱ्यात मृतदेह अडकल्याचे नागरिकांना दिसून आले. उपस्थितांनी तत्काळ मृतदेह बाहेर काढला.
धारणगावच्या पुढे समसापूर या नावाचे गाव आहे. या ठिकाणी बंधारा बांधण्यात आला असला, तरी तो चुकीच्या पद्धतीने आल्याने मोठ्या प्रमाणात बॅक वॉटर साचते. त्यामुळे नदी ओलांडताना नागरिकांचा जीव धोक्यात येतो. त्या भागातील शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. त्यामुळे हा बंधारा तोडा अन्यथा दुधना नदीवर पूल निर्माण करा, अशी मागणी या ग्रामस्थांनी केली. धारणगाव ग्रामस्थांनी मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणल्यानंतर प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षांची मागणी असूनही दुधना नदीवर पूल उभारण्यात आला नाही. जर पूल असता, तर गजाननचा जीव वाचला असता, अशी भावना या वेळी संतप्त ग्रामस्थांनी व्यक्त केली.