परभणी : शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळवून देण्यासाठी ‘ॲग्रीस्टॅक’ योजना राबविण्यात येत आहे. परभणी तालुक्यातील एकूण ७० हजार ६९० खातेदारांपैकी ४७ हजार ४५६ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली असून, उर्वरित २३ हजार २३४ शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी’ तयार करून घेण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे यांनी केले आहे.

विविध कृषिविषयक योजनांतर्गत शेतकरी व त्यांच्या शेतजमिनींची माहिती एकत्र करून ‘फार्मर आयडी’ (शेतकरी ओळख क्रमांक) देण्यात येत आहे. १५ एप्रिलपासून ‘फार्मर आयडी’ आवश्यक करण्यात आलेला आहे आणि हा क्रमांक शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याासाठी अनिवार्य आहे. शेतकऱ्यांनी त्वरित आपल्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून फार्मर आयडी मिळवावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. राजापुरे यांनी केले आहे.

‘फार्मर आयडी’ तयार केल्यामुळे पीएम किसान योजनेचा लाभ सुलभ होतो. शेतकरी कर्ज वितरणात सुलभता, पीक विमा योजनेचा लाभ मिळतो. पीक हमीभाव खरेदीसाठी मदत होते. किसान क्रेडिट कार्डअंतर्गत कर्ज सुलभतेने मिळते. महाडीबीटी अंतर्गत कृषी योजनांचा लाभ मिळतो. नैसर्गिक आपत्तीत पीक नुकसानीचे अनुदान मिळते. राज्य व केंद्र शासनाच्या सर्व कृषी योजनांसाठी आवश्यक आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्रामपंचायत स्तरावरील सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र, सेतू कार्यालय येथे शेतकरी ओळखपत्राची नोंदणी करता येते. शेतकरी ओळखपत्राच्या नोंदणीसाठी शेतकऱ्याचा आधार कार्ड आणि ७/१२ उतारा ही आवश्यक कागदपत्रे आहेत. ‘फार्मर आयडी’ तयार न केल्यास नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे अनुदान, पीक विमा योजनेचा लाभ व इतर कृषी सवलती मिळणार नाहीत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपली नोंदणी तत्काळ करून घेणे आवश्यक आहे.