परभणी : राष्ट्रीय महामार्गावरील पेडगांव ते पेडगाव रेल्वेस्थानक या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्त्यावर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने काम न करता तब्बल ४५ लाख ७९ हजार रुपयांची रक्कम हडप केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला.

विशेष म्हणजे या प्रकाराची ओरड झाल्यानंतर संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी सारवासराव करण्याचा प्रयत्न केला. तथापि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कोणतीही कारवाई संबंधितांवर केली नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करीत संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने २०२२- २३ या आर्थिक वर्षामध्ये नाबार्डच्या माध्यमातून जांब, पेडगाव रेल्वे क्रॉसिंग ते पेडगाव फाटा या रस्त्याच्या कामासाठी साडेपाच कोटी रुपयांची तरतूद केली होती. तत्पूर्वी बांधकाम विभागाने या प्रशासकीय बाबी पूर्ण करण्याआधी संबंधीत रस्त्याचे काम करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्रसुध्दा घेतले होते. हे काम पूर्ण झाले, या कामाची मोजमाप पुस्तिका पूर्ण करुन त्याचे पाच कोटी दहा लाख रुपये अदाही करण्यात आले. तांत्रिक निकषानुसार या रस्त्याची पुढच्या पाच वर्षासाठी म्हणजेच २०२८ पर्यंत देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी यांचीच होती. एवढे सगळे स्पष्ट असताना पुन्हा जिल्हा परिषदेने याच कामासाठी ४५ लाख ७९ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली. कार्यारंभ आदेश दिले.

प्रत्यक्ष काम काहीच नाही पण मोजमाप पुस्तिका तयार करून हा सगळा निधी अख्खा हडप करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता धोंडीराम उडाणशिवे, उपअभियंता दयानंद सोनकांबळे व ठेकेदार रामराव श्रीरंगराव आरगडे यांनी संगनमताने या कामाची खोटी मोजमाप पुस्तिका तयार करून काम पूर्णत्व प्रमाणपत्रासह हा अपहार केल्याचे संतोष देशमुख यांनी निदर्शनास आणून दिले होते. यासंदर्भात कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. प्रशासनाने अक्षरशः या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष केले आणि पद्धतशीर पांघरून घातले.

जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि संबंधित कामाच्या ठेकेदाराने या कामांबाबत अंदाजपत्रके, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, ई-निविदा, ठेकेदारांची नियुक्ती, करारनामा, कार्यारंभाचा आदेश या प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून हा सर्व प्रकार कागदावरच झाला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी हा सर्व प्रकार निदर्शनास आणला मात्र जिल्हाधिकारी अथवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अद्याप या प्रकरणात संबंधितांवरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही.

याप्रकरणी पेडगाव ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिल्याबरोबर संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी याच रस्त्यावर थातूरमातूर काम करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणात अद्यापही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे अक्षम्य दुर्लक्ष केले त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. या सर्व प्रकाराबद्दल आता संतोष देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली आहे.