परभणी : जिंतूर तालुक्यातील कोक या गावात गॅस्ट्रोची साथ पसरल्याने १४० नागरिक आजारी पडले असून, संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या आजारामुळे अनेकांना उलट्या-जुलाब होऊन तब्येत खालावल्याचे निदर्शनास आले आहे. कोक या गावात गॅस्ट्रोची लागण पसरल्याचे निदर्शनास येताच आरोग्य विभाग व ग्रामपंचायत कार्यालयाकडून ग्रामीण रुग्णांना बोरीच्या ग्रामीण रुग्णालयात तसेच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून गावातील शाळेमध्ये तात्पुरता आरोग्य कॅम्प उभारून उपचार व तपासणीची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. या प्रकरणात एकूण १३९ रुग्णांना ग्रामस्तरावर ओ.पी.डी. मध्ये उपचार देण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण रुग्णालय, बोरी येथे ७७ रुग्ण दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ६६ रुग्णांना पूर्णपणे बरे होऊन सुट्टी देण्यात आली असून ११ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे. संदर्भित रुग्णांपैकी २ गंभीर रुग्ण येथील जिल्हा रुग्णालयात दाखल असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या उद्रेकाचे प्राथमिक कारण पिण्याच्या पाण्याचे दूषितीकरण असल्याचे निदर्शनास आले आहे. आरोग्य विभागाकडून ५ पाणी नमुने, ५ विष्ठा (स्टूल) नमुने आणि टी.सी.एल. पावडर नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून गावात व परिसरात क्लोरीनेशन, स्वच्छता आणि जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सद्यस्थितीचा आढावा घेऊन सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य यंत्रणांना आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. प्रशासन सर्व घडामोडींवर सतत लक्ष ठेवून असून नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. सुरक्षित पाणी वापरणे, स्वच्छता राखणे आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व ग्रामपंचायत यांच्यात समन्वय साधून आवश्यक ती सर्व प्रतिबंधात्मक व उपचारात्मक पावले उचलण्यात आली आहेत अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

गांभीर्याने परिस्थिती हाताळण्याच्या सूचना

कोक येथील प्रकार आरोग्य यंत्रणेने गांभीर्याने घेतला आहे. सर्व गॅस्ट्रोच्या रुग्णावर यथोचित उपचार सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून आहे. आरोग्ययंत्रणेवर व परिस्थितीवर आपले पूर्ण लक्ष आहे, अतिशय गांभीर्याने ही परिस्थिती हाताळण्याच्या सूचना आपण दिल्या आहेत. – मेघना साकोरे-बोर्डीकर, पालकमंत्री