प्रबोध देशपांडे

शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने मुंबई, पुण्यात गेलेले विदर्भात हजारो युवक लॉकडाउनमुळं गेल्या सव्वा महिन्यापासून तिथं अडकून पडले आहेत. दोन वेळच्या जेवणासाठीही त्यांचे हाल होत असल्याने त्यांचे पालक मुलांच्या काळजीनं व्याकूळ झाले आहेत. विदेश, परराज्यातून युवकांना आणण्यासाठी प्रयत्न होत असतांना नोकरदार युवक व विद्यार्थ्यांची आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी का नाही? असा सवाल पालकवर्गाकडून उपस्थित केला जात आहे.

राजस्थानमधील कोटा येथे राज्यातील हजारो विद्याार्थी अडकले. त्यांना आणण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. टाळेबंदी लागू होण्यापूर्वी केंद्र सरकारने विदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना विशेष विमानाने भारतात आणून त्यांना सुखरुप घरी पोहोचवले. मुंबई, पुण्यात नोकरी व शिक्षणाच्यानिमित्ताने राहणाऱ्या विदर्भातील युवकांच्या बाबतीत मात्र राज्य शासन उदासीन भूमिका घेत असल्याचा आरोप पालकांकडून होत आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. विदर्भातील हजारो विद्याार्थी पुण्यात शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. विदर्भात मोठ्या उद्योग-व्यवसायांचा अभाव आहे. त्यामुळे युवकांना रोजगार उपलब्ध होत नाहीत. नोकरीसाठी विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील लाखो युवकांची पावलं मुंबई, पुण्याकडे वळली आहेत. विविध क्षेत्रातील नोकरीच्या निमित्ताने ते त्या ठिकाणी राहतात.

मुंबई, पुण्यातील अनेक कंपन्यांमध्ये काम सुरू असतांनाच करोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून २३ मार्चपासून महाराष्ट्रात लॉकडाउन लागू करण्यात आलं. सार्वजनिक वाहतुकीची सर्व साधनेही बंद झाल्याने विदर्भातील हजारो युवकांना परतण्याची संधीच मिळाली नाही. गेल्या सव्वा महिन्यापासून हे नोकरदार युवक व विद्यार्थी मुंबई, पुण्यात अडकले आहेत. लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे हॉटेल, भोजनालय, डबेवाले, कामवाले बंद असल्याने खाण्यापिण्यासाठी त्यांचे चांगलेच हाल होत आहेत. अनेकांची उपासमारही होते. करोना संक्रमणापासून सुरक्षित ते घरातच राहत असले तरी आपल्या गावी परतण्यासाठी त्यांच्या जीवाची घालमेल होत आहे. आपले पाल्य अडकून पडल्याने पालकांचीही चिंता प्रचंड वाढली. त्यांना परत आणण्यासाठी पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले. मात्र, प्रशासनाकडून त्यांना कुठलीही दाद दिली जात नाही. त्यामुळे हा प्रश्न गंभीर झाला असून, मुंबई, पुण्यात अडकलेल्यांना परत आणण्याची मागणी होत आहे.

पुढे काय?

मुंबई, पुण्यात अडकलेल्या युवकांचा परतण्याचा मार्ग अवघडच आहे. सध्या ३ मेपर्यंत लॉकडाउन आहे. करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, त्याचा कालावधी आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यातच सार्वजनिक वाहतुकीचे साधनही बंद राहतील. हा प्रकार त्या सर्व विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखा आहे. त्यांच्याभोवती करोनाचा धोका कायम आहे. त्यांना आणण्याची व्यवस्था त्यांचे पालक करण्यास तयार असल्याने सरकारने परवानगी द्यावी. त्यामुळे प्रशासनाचा देखील ताण कमी होईल, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी व्यक्त केलं आहे.

या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांद्वारा त्यांना घरी आणण्याची व्यवस्था करण्यास हरकत नाही. मात्र, शासनाला त्या विद्यार्थी व नोकरदारांचा विसर पडल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी परवानगी दिली जात नाही, असे मत अकोल्यातील सीताबाई महाविद्याालयाच्या प्राचार्या डॉ. आर. डी. सिकची यांनी व्यक्त केलं आहे.