सावंतवाडी: ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ल्याला पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. किल्ल्याच्या दिशादर्शक बत्तीजवळ असलेल्या व्यंकट बुरुजाची समुद्राकडील बाजू लाटांच्या जोरदार माऱ्यामुळे ढासळत आहे. त्यामुळे, किल्ल्याच्या तटबंदीच्या पडझडीची मालिका पुन्हा सुरू झाल्याचे समोर आले आहे.
पावसाळ्यात समुद्राला येणाऱ्या उधाणामुळे लाटांचा वेग वाढतो आणि याच वेळी किल्ल्याची पडझड मोठ्या प्रमाणात होते. नुकत्याच झालेल्या जोरदार माऱ्यात व्यंकट बुरुजाचा खालचा भाग कोसळला.
इतिहासाकडे पाहिले तर, विजयदुर्ग किल्ल्याची बांधणी करताना सागर तटबंध आणि खडकांची नैसर्गिक रचना यांचा विचारपूर्वक उपयोग करण्यात आला होता. हा किल्ला खडकाळ द्वीपकल्पावर बांधलेला असल्यामुळे त्याला तीन बाजूंनी खोल पाणी आणि नैसर्गिक खडकांचे संरक्षण लाभले आहे. तत्कालीन परिस्थितीत, समुद्राच्या लाटा थेट तटबंदीवर आदळून नुकसान होऊ नये म्हणून तिरक्या उताराची खडकांची मांडणी करण्यात आली होती. यामुळे लाटांची ऊर्जा कमी होऊन ती परत समुद्रात वळवली जात असे.
मात्र, कालांतराने निसर्गातील बदलांमुळे ही रचना कमकुवत होत गेली आणि त्यावर कोणताही उपाययोजना करण्यात आली नाही. ‘ट्रायपॉड’ हा यावर एक उत्तम पर्याय मानला जातो. काँक्रीटच्या माध्यमातून हे ट्रायपॉड उभारणे आता गरजेचे झाले आहे. आता युनेस्कोच्या ताब्यात हा किल्ला गेल्यामुळे विजयदुर्ग किल्ल्याचा कायापालट होणार असून, कोसळलेल्या तटबंद्या पुन्हा भक्कमपणे उभ्या राहतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, तोपर्यंत या पडझडीला जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.