Parth Pawar all controversy list : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलं आहे. पार्थ पवारांनी पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील १,८०० कोटी रुपयांची जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. आयटी पार्क उभारण्याच्या नावाखाली पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने ४० एकरांचा भूखंड कुठलंही शासकीय शुल्क न भरता खरेदी केल्याचा आरोप केला गेला. यावरून पार्थ पवारांच्या अटकेची, अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
पार्थ पवार व वाद हे समीकरण फार जुनं नाही. पार्थ पवारांमुळे त्यांचे वडील अजित पवार व आजोबा शरद पवार देखील अनेकदा अडचणीत आले आहेत. कधी पुण्यातील कुख्यात गुंडाची भेट घेणं, कधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारधारेविरोधात वक्तव्य करणं, अयोध्येतील राम मंदिराबाबत भाष्य करणं, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर सरकारला अडचणीत आणणारी टिप्पणी करणं यामुळे पार्थ पवार वादात अडकले आहेत.
कुख्यात गुंड गजानन उर्फ गज्या मारणेची भेट
कोथरुडमध्ये दहशत असलेला गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याने २५ जानेवारी २०२४ रोजी पार्थ पवार यांची भेट घेतली होती. मारणेने पार्थ पवारांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यावर अजित पवार यांना माध्यमांसमोर सारवासारवं करावी लागली होती. अशी भेट घेणं चुकीचं असल्याचं अजित पवारांनी म्हटलं होतं. मारणेच्या नावावर खुनासह ३० गंभीर गुन्हे दाखल आहेत. गजा मारणे कोथरूडमध्ये गुंडांची टोळी चालवतो. त्याच्या टोळीतील अनेक गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे.
राम मंदिराबाबत टिप्पणी
पार्थ पवार यांनी सप्टेंबर २०२० मध्ये अयोध्येतील राम मंदिराला पाठिंबा दर्शवणारी एक पोस्ट समाजमाध्यमांवर केली होती. मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पार्थ यांनी म्हटलं होतं की ‘या सांस्कृतिक विजयाबाद्दल आपण नम्र असलं पाहिजे’. यावर पार्थ पवारांचे आजोबा शरद पवारांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. शरद पवांरांनी पार्थ यांची टिप्पणी म्हणजे अपरिपक्वतेचं उदाहण असल्याचं म्हटलं होतं.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी
त्याच वर्षी जुलै महिन्यात पार्थ पवार यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडे मागणी केली होती की सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. अजित पवार हे त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते.
