Who is Digvijay Patil: पुण्यातील मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचे भागीदार असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सहजिल्हा निबंधक संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर सदर गुन्हा दाखल झाला. तसेच महार वतनाच्या जमिनीची पॉवर ऑफ ॲटर्नी असलेल्या शीतल तेजवानी यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
पार्थ पवार यांच्याकडे अमेडिया एलएलपी कंपनीची ९९ टक्के भागीदारी असताना त्यांना या एफआयआरमधून वगळल्यामुळे विरोधकांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. याबद्दल माध्यमांनी अजित पवार यांना थेट प्रश्न विचारला असता त्यांनी याचे उत्तर दिले. जमिनीची नोंदणी करण्यासाठी आलेल्या आणि व्यवहारावर ज्यांची सही आहे, त्यांच्यावरच गुन्हा दाखल केल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली असल्याचे अजित पवार म्हणाले.
कंपनीत एक टक्के भागीदारी असूनही दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे दोन दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा आहे. पार्थ पवार यांचे मामेभाऊ असलेले दिग्विजय कोण आहेत? याचीही चर्चा होत आहे.
सुनेत्रा पवार यांचे पुतणे
२५ वर्षीय दिग्विजय पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांचे पुतणे आहेत. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार हे पुण्यातील शिवाजीनगर येथील एकाच पत्त्यावर नोंदणीकृत असलेल्या तीन एलएलपी मध्ये (मर्यादित दायित्व भागीदारी) संचालक आहेत.
दिग्विजय यांचे वडील अमरसिंह पाटील हे सुनेत्रा पवार यांचे सख्खे भाऊ आहेत. अमरसिंह पाटील धाराशिव जिल्ह्यातील तेर गावाचे सरपंच होते. त्यांचे २०२० साली निधन झाले. अमरसिंह पाटील यांच्या जवळच्या व्यक्तीने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, मृत्यूच्या १० ते १५ वर्षांपूर्वी अमरसिंह पाटील तेरहून पुण्यात स्थायिक झाले होते. राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांचे ते सावत्र बंधू होते.
“अमरसिंह पाटील हे अधूनमधून गावी तेरला येत असत पण दिग्विजय फारसे गावाला आलेले नाहीत. दिग्विजय हा स्वभावाने खूप शांत मुलगा आहे. तो कुणाशीही जास्त संवाद साधत नाही. माझ्या अंदाजानुसार अमरसिंह यांच्या वडिलांची तेरमध्ये २००-३०० एकर शेती आहे. अमरसिंह राजकारणापासून दूर राहिले. ते अधूनमधून बहीण सुनेत्राची भेट घ्यायला जात असत”, अशीही माहिती त्यांच्या मित्राने दिली.
पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे महाराष्ट्र रिडेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन एलएलपी, अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी आणि अमेडिया होल्डिंग्ज एलएलपी या तीन कंपन्यांचे संचालक आहेत. याव्यतिरिक्त पाटील हे डीव्हीजे इन्फ्रोकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संचालक आहेत. अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपीची स्थापना २०२० मध्ये झाली तर अमेडिया होल्डिंग्ज एलएलपीची स्थापना २०२१ मध्ये झाली. तर महाराष्ट्र रिडेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन एलएलपीची स्थापना याच वर्षी मे महिन्यात झाली.
कोण आहेत शीतल तेजवानी
याच प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानी यांच्यावर फसवणुकीचे आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी २०१८ साली सेवा विकास बँकेच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी त्यांचे पती सागर सूर्यवंशी आणि तेजवानी यांच्याविरुद्ध पुण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. २०२० मध्ये, सेवा विकास सहकारी बँकेने सूर्यवंशी, तेजवानी आणि या प्रकरणात इतरांशी संबंधित असलेल्यांच्या अनेक मालमत्ता जप्त केल्या.
कोरेगाव पार्क जमीन खरेदी प्रकरणात महार वतनाच्या मूळ शेतकऱ्यांनी तेजवानी यांना जमिनीचे व्यवहार करण्यासाठी कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अटॉर्नी) दिले होते. त्यामुळे तेजवानी यांनी या जमिनीची खरेदी लिहून दिली. अमेडिया एलएलपी कंपनीतर्फे दिग्विजय पाटील यांनी ही जमीन लिहून घेतली.
