सांगली : एकेकाळी जिल्ह्यात दरारा असलेल्या काँग्रेसला पलूस व जत नगरपालिका वगळता अन्य ठिकाणी तोलामोलाचे उमेदवारच मिळाले नसल्याने आणि तडजोडीच्या राजकारणात माघार घेतल्याने यावेळच्या निवडणुकीतून पक्षाचे निशाण पंजा गायब झाले आहे.
जिल्ह्यात ईश्वरपूर, आष्टा, जत, तासगाव, विटा आणि पलूस या सहा नगरपालिका व शिराळा, आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. पलूस व जत या दोन नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिले आहेत. मात्र, अन्य ठिकाणी महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली केवळ पाठिंबा देण्याचे काम केले आहे.
ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेसला सोबत घेतले असल्याचे सांगितले. मात्र, उमेदवारी देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचेच एबी फॉर्म दिले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने पक्षाकडून उमेदवारी दाखल करण्याचे टाळण्यात आले. विटा येथे काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांनी उमेदवारी दाखल करण्याची तयारी केली होती. मात्र, उमेदवारी दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपुर्वी एक दिवस अगोदर भाजपची उमेदवारी मिळाल्याने त्यांनी काँग्रेसशी फारकत घेउन भाजपच्या उमेदवारीवर अर्ज भरला. तासगावमध्ये काँग्रेसने माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीला पाठिंबा दिला असल्याने काँग्रेस अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून दूरच राहिला आहे. शिराळा, आटपाडीमध्ये काँग्रेसला सक्षम नेतृत्वच नाही, यामुळे काँग्रेसकडे उमेदवारीची मागणीच कोणी केली नाही.
जतमध्ये माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी पक्षाकडून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुक लढविण्याची तयारी केली आहे. नगराध्यक्ष पदासाठी सांगली बाजार समितीचे सभापती सुजयनाना शिंदे यांची उमेदवारी दाखल केली असून निवडणुकीत पॅनेल उभे करत असताना महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर पलूसमध्ये माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी संजीवनी पुदाले या महिलेला उमेदवारी देउन पॅनेल मैदानात उतरवले आहे. जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या मदतीने पलूस नगरपालिकेची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. डॉ. कदम यांच्यासाठी पलूस नगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे.
काँग्रेसने १५ जागासाठी उमेदवारी दाखल करण्याची तयारी केली होती. एबी फॉर्मही तयार होते. मात्र, मतविभाजन होउ नये यासाठी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल करू नये अशा सूचना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून मिळाल्यानंतर माघार घेण्यात आली. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत- राजेंद्र शिंदे, काँग्रेस शहर अध्यक्ष ईश्वरपूर.
