भाजपा सरकारला केंद्रात नऊ वर्षे पूर्ण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटनाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण नसल्याची बाब समोर आली आहे. यावरून काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. आता, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही केंद्रावर टीका केली आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रपती पदाच्या निवडीबाबतही मोठा दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत म्हणाले की, “राहुल गांधी यांनी जो मुद्दा मांडला त्या मुद्द्याशी आम्ही सहमत आहोत. भारतीय संसदेचे प्रमुख हे राष्ट्रपती असतात. राष्ट्रपती हे संसदेचे आणि लोकशाहीचे संरक्षक आहेत. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींनाच निमंत्रण नसेल तर ही गंभीर बाब नाहीय तर हास्यास्पदसुद्धा आहे. संसदभवनाचं उद्घाटन देशाच्या राष्ट्रपतींच्याच हस्ते व्हायला हवं. पंतप्रधान नंतर येतात. लोकसभेचे अध्यक्ष नंतर येतात. प्रत्येक गोष्टीचं निवडणुकीकरता राजकारण करायचं आणि फक्त मी, मी आणि मीच करायचं. त्या मीपणाचा हा कहर आहे.”

हेही वाचा >> “मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, कारण…”, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

“सेंट्रल विस्टा प्रकल्पाची अजिबात गरज नाही. या देशाची संसद अजून १०० वर्षे चालली असती. आपल्यापेक्षाही जुन्या इमारती जगामध्ये आहेत. पण आपल्याकडे फक्त एका राजकीय हव्यासापोटी आणि हा नवा इतिहास मी घडवला. मी दिल्ली नवी घडवली असं दाखवण्यासाठी लाखो कोरोडो रुपये खर्च करून, लोकांच्या पैशांचा चुराडा करून ही नवी वास्तु कोरोना काळात उभी केली”, अशी टीकाही संजय राऊतांनी केली.

“राष्ट्रपतींना डावलून संसदेचं उद्घाटन होतंय, ही लोकशाही चिंतेची गोष्ट आहे. काँग्रेसची भूमिका ही देशाची भूमिका आहे. राष्ट्रपतीचा गेल्या नऊ वर्षांत वारंवार अपमान होतोय. अन्यायाविरोधात आवाज उठवणार नाहीत, प्रश्न विचारणार नाहीत, जाब विचारणार नाहीत, अशा लोकांनाच राष्ट्रपती पदावर गेल्या दोन कालखंडात बसवलं जातंय”, असा गंभीर आरोपही संजय राऊतांनी यावेळी केला.

हेही वाचा >> शरद पवारांचं राहुल गांधींबाबत मोठं विधान; म्हणाले, “कर्नाटक निवडणुकीचे निकाल म्हणजे…!”

जयंत पाटील झुकणार नाहीत – संजय राऊत

दबावाचं राजकारण सुरू आहे. तुम्ही जर आमच्या मनाप्रमाणे वागलात नाहीत, पक्षात आला नाहीत तर आम्ही तुम्हाला ईडीच्या माद्यमातून त्रास देऊ. जयंत पाटलांसारखे मराठा बाण्याचे लोक जे झुकणारे नाहीत ते आता त्रास भोगताहेत, जे आम्हीही भोगलंय. या देशामध्ये लोकशाही आहे कुठे. या महाराष्ट्रात कुठे आहे लोकशाही. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करूनच हे सरकार आलेलं आहे. यापुढे ते सुरू राहिल. पण तुम्ही कितीही त्रास दिला, पण या राज्यात असे काही लोक आहे जे तुमच्यासमोर झुकणार नाहीत, असंही यावेळी संजय राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People who will not raise their voices against injustice sanjay rauts serious accusations against the center over the election of the president sgk
First published on: 23-05-2023 at 10:48 IST