सातारा : साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा या म्हणीप्रमाणे प्रतिवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी फलटण शहरात येत असते. आगमनाच्या निमित्ताने सर्वत्र मोठा उत्साह पाहायला मिळतो. सरकारी यंत्रणेपासून,व्यक्तिगत पातळीवर प्रत्येक जण वारकऱ्यांच्या सेवेत मग्न असतो. यंदा मात्र माउलींचे आगमन अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेले असताना फलटण शहरातील अंतर्गत पालखी मार्गाची कामे रखडल्याने या मार्गावर खड्डे, चिखल आणि राडारोडा पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. हा सोहळा दि. २८ रोजी फलटण शहरात मुक्कामी येणार आहे. शहरातील जिंती नाका, मलठण, पाचबत्ती चौक, गजानन चौक, महात्मा फुले चौक, गिरवी नाका या मार्गे हा सोहळा विमानतळावर मुक्कामासाठी जात असतो.

यंदाच्या वर्षी रस्त्यांच्या प्रलंबित कामांमुळे वारीची ही वाट बिकट अवस्थेत आहे. येत्या दहा दिवसांत या ठिकाणची अर्धवट कामे पूर्ण होतील. याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे.

मलठण, कामगार वसाहत, गिरवी नाका, रिंग रोड परिसरात सुरू करण्यात आलेले सिमेंट रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झालेली आहे. शहरातील अन्य अंतर्गत रस्त्यांचीही अक्षरश: चाळण झाली आहे. अशा परिस्थितीत पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना फलटण शहरात त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मुदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार सचिन पाटील, आळंदी देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागरजन यांनी पालखी तळ पाहणी दौऱ्याप्रसंगी रस्त्याच्या कामांबाबत सूचना दिल्या आहेत.

आमदार सचिन पाटील यांनी पालखी मार्गावरील अडथळ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देऊन फलटणमध्ये आढावा बैठक घेतली होती. त्यांनी प्रशासनाला अडथळे तत्काळ दूर करण्यास सांगितले आहे. मात्र अद्याप रस्त्याची सर्व कामे अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने याबाबत गांभीर्याने तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फलटण शहरात पालखी सोहळा आगमनापूर्वी रस्त्यांची सर्व कामे व मार्गातील चिखल, राडारोडा दूर करण्यासाठी, रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी यंत्रणा काम करत आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागताची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. वारकऱ्यांची व भाविकांची शहरात सर्व व्यवस्था व्हावी, अशी कामे सुरू आहेत. ही सर्व कामे सोहळ्याच्या आगमनापूर्वी पूर्ण होतील. – निखिल मोरे, मुख्याधिकारी, फलटण पालिका.