scorecardresearch

“आज शरद पवार मुख्यमंत्री असते तर…”; शरद पवार स्टेजवर असतानाच यशोमती ठाकूर यांचं मोठं विधान

रविवारी पार पडलेल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये भाषणादरम्यान यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केलंय.

Sharad Pawar CM
पवार स्टेजवर असतानाच केलं वक्तव्य

महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये राज्यातील अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर खटके उडत असल्याचं चित्र दिसत आहे अगदी मुंबईच्या शेजरी असणाऱ्या ठाण्यामध्येही स्थानिक राजकारणात हे पक्ष परस्परविरोधी वक्तव्य करताना दिसत आहेत. असं असतानाच आता या शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीमधील धुसपूस थेट मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचलीय. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या एका वक्तव्याची राज्याच्या राजकारणामध्ये चांगलीच चर्चा आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मंचावर असताना यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केलंय.

नक्की वाचा >> पवारांच्या घरावरील हल्ल्याला भाजपाची फूस असल्याचा शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “माकडांची माणसं झाली पण काही…”

शरद पवार हे रविवारी अमरावती दौऱ्यावर होते. अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर व सभागृहाचे लोकार्पण सोहळाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शरद पवारांबरोबरच महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूरांसहीत इतर नेतेही उपस्थित होते, या कार्यक्रमात मंत्री यशोमती ठाकूर यांनी बोलतांना मुख्यमंत्री पदाबाबद मोठं वक्तव्य केलं.

“शरद पवारांसाठी काय आणि किती बोलावं. छोट्या तोंडी मोठा घास घेतेय पण तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचं चित्र अजून वेगळं असतं,” असं यशोमती ठाकूर म्हणाल्यानंतर काही उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. त्यावर पुन्हा बोलताना, “टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाही. पावरांसाठी जोरात टाळ्या वाजवा,” असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

नक्की पाहा >> सिल्व्हर ओक आंदोलन Video: पोलीस कर्मचारी आंदोलनकर्त्या महिलेला धक्का देत असतानाच सुप्रिया सुळेंनी तिचा हात पकडला अन्…

“चार वेळा पवार मुख्यमंत्री झाले पण आज काळाची गरज आहे. ज्यावेळेस महाविकास आघाडी झाली तेव्हा पवार मला म्हणाले होते मी ऐकलं तुझं टीव्हीवर. मला कोणी काही सांगितलं नव्हतं. पण पवार या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत आहेत. आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. कोणीही कितीही काहीही तीर मारले तरी महाराष्ट्रातील सरकार स्थीर राहणार असं या ठिकाणी मी सांगते,” असंही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Picture of maharashtra would have been different if sharad pawar was cm says yashomati thakur scsg