वर्धा : समृद्धी महामार्गाचे बांधकाम करताना थेट कालव्यातच खांब उभारण्याचा प्रकार घडला असून शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था बाधित झाली आहे.

वर्धेलगत येळाकेळी परिसरात दहेगाव आष्टा भागात कालव्याच्या मधोमध समृद्धीवरील पुलाचे तीन खांब उभे करण्यात आले आहते. कालव्याच्या मधोमध खांब उभे करण्याची परवानगी कशी देण्यात आली, असा सवाल आमदार डॉ. पंकज भोयर यांनी रस्ते विकास महामंडळ व पाटबंधारे विभागाला केला आहे. चक्क कालव्यातच खांब उभारल्याने तसेच पूल तोडून पाइप टाकल्याने पाण्याचा प्रवाह अडला आहे. शेतात पाणी पोहोचण्याचा मार्गच त्यामुळे ठप्प झाला आहे. या संदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यावर आमदार डॉ. भोयर यांनी कालवा परिसराची पाहणी केली. सेलू पाठबंधारे उपविभागात येणाऱ्या आष्टा कालव्याला समांतर महामार्गाचा एक किलोमीटर लांबीचा पट्टा आहे. रस्ता बांधण्यापूर्वी शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी कालव्यावर पूल बांधण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र महामार्गाच्या बांधकामादरम्यान हा पूल पाडण्यात आला. त्याऐवजी कालव्यात पाइप टाकण्याचा प्रकार करीत मार्ग उपलब्ध करून देण्यात आला. दहेगाव शाखेची मुख्य वितरिका असल्याने आष्टा वितरिकेत पाण्याचा विसर्ग मोठय़ा प्रमाणात असतो. परिणामी पाण्याच्या प्रवाहात अनेक गोष्टी वाहून येतात. कचरा, झाडे व सोबतच जनावरेही पाइपमध्ये अडकण्याची भीती व्यक्त होते. प्रवाह बाधित झाल्याने लगतच्या शेतात पाणी शिरून पिकांचे नुकसान होत आहे. तर अन्य शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे.