पिंपरी- चिंचवड: बेरोजगारीतून ४० वर्षीय व्यक्तीने बंदुकीच्या धाकावर चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पिंपळे गुरवमध्ये घडली आहे. एक वर्षांपासून बेरोजगार असलेला मणिपूर येथील ‘सांगबोई कोम सेरटो’ याने उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या कल्पतरू इस्टेट फेज तीनमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत प्रतिकार करणारे दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. गगन सीताराम बडेजा यांनी याबाबत सांगवी पोलिसात तक्रार दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, ३१ जुलै रोजी रात्री सात च्या सुमारास गगन बडेजा यांच्या घराची बेल वाजली. आईने दरवाजा उघडला, पण बाहेर कुणीच दिसल नाही. काही मिनिटांनी पुन्हा दरवाजाची बेल वाजली. गगन यांनी दरवाजा उघडला. चोरटा सांगबोई समोर उभा होता. “सीताराम बड़ेजा का पार्सल आया है. उनका आईडी कार्ड दिखाओ”, अस म्हणल्याने तक्रारदार गगन यांनी आयकार्ड आणण्यासाठी आत जात असताना सांगबोई ने आत शिरला. तक्रादार यांनी त्याला आत आल्याने हटकले. काही कळायच्या आत सांगबोईने बॅगेतून बंदूक काढली आणि गगन यांच्या कपाळाला लावली. घरातील मौल्यवान वस्तू आणि दागिने आणण्यास सांगितले.

हॉलमध्ये काहीतरी सुरू आहे, म्हणून बेडरूमध्ये असलेला गगन यांचा भाऊ बाहेर आला, सांगबोईने बंदुकीचे नोक त्याच्या दिशेने केले. दोघे भाऊ घाबरले होते. तिघांमध्ये जोरदार झटापट झाली. दोन्ही भावांनी त्याचा प्रतिकार केला. तेवढ्यात सांगबोईने कंबरेला असलेली कुकरी काढली. हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा त्यांच्यात झटापट झाली. अखेर त्याला खाली पाडले, त्याचे हात पाय बांधले. मग सांगवी पोलिसांना बोलवून घेतलं. पोलिसांनी दोन्ही भावांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. दरम्यान, मणिपूर येथील रहिवासी असलेला सांगबोई कोम हा सध्या पुण्यातील कोंढवा येथे राहत होता. त्याने पाळत ठेवून चोरीचा प्लॅन केला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बेरोजगरीतून हे पाऊल उचल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

“३१ जुलै रोजी ही घटना घडली आहे. दोन्ही भावांनी चोरट्याचा प्रतिकार केला. सांगबोई हा मणिपूर येथील आहे. त्याच्यावर याआधी कुठलाही गुन्हा दाखल नाही. त्याला आम्ही अटक केली आहे. दोन वेळेस न्यायालयात हजर केलं होतं. आता तो येरवडा कारागृहात आहे.” – अमोल नांदेकर, गुन्हे पोलीस निरीक्षक